12 January, 2026

हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहाद्दूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम

• शिक्षण विभागामार्फत घोषवाक्य, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन लातूर, दि. १२ (जिमाका) : हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहाद्दूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मानवतेसाठी त्याग, धैर्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या श्री गुरु तेग बहाद्दूर यांचा इतिहास शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. श्री गुरु तेग बहाद्दूर यांचा गौरवशाली इतिहास, त्यांनी दिलेले बलिदान आणि त्यांचे कार्य याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी सर्व शाळांमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविला जाणार आहे. यासोबतच चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नांदेड येथे होत असलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन केले जाणार आहे. याबाबत शिक्षण विभागामार्फत सर्व गट शिक्षणाधिकारी यांची बैठक घेवून सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments: