13 January, 2026
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाची सुरुवात महाराष्ट्रातूनच – महंत सुनीलजी महाराज
हिंगोली (जिमाका), दि. 13 : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातूनच होत असून संख्या नव्हे तर सुयोग्य नियोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज यांनी केले. हिंद दी चादर या राज्यस्तरीय समन्वय समिती व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज, डॉ. आकाश राठोड, हरनामसिंह चव्हाण, बाबुराव राठोड, ॲड. संतोष राठोड, गणेश राठोड यांच्यासह जगदीश खुराना, जीतसिंग साहू, बिकासेठ भाटीया, रतनामसिंह, एम.पी. राठोड, अशोक चव्हाण, नागोराव राठोड, दिलीप राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय धर्म जागरण समितीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.
महंत सुनीलजी महाराज म्हणाले की, देशात जल, स्त्री व धर्मासाठी अनेक लढाया झाल्या आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मरक्षणासाठी आपले शिश अर्पण केले, मात्र धर्मपरिवर्तन स्वीकारले नाही. त्यांच्या बलिदानामुळे धर्मस्वातंत्र्य व मानवी मूल्यांचे रक्षण झाले. 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिंद दी चादर कार्यक्रम पार पडला असून येत्या 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील पिढीला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार समजावेत यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, रांगोळी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या विचारांचा शालेय अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. लखीशहा बंजारा यांनी गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याची घटना तसेच मख्खनशहा लभाना यांनी त्यांची ओळख पटवून दिल्याचा इतिहास त्यांनी यावेळी सांगितला. धर्मरक्षणासाठी शिकलीकार समाजाने शस्त्र पुरवठा केल्याचाही महंत सुनिल महाराज यांनी उल्लेख केला.
नांदेड येथील कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्व समाजांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, समाजमाध्यमांच्या माध्यमातून व्यापक प्रचार व जनजागृती करावी, असे आवाहन महंत सुनीलजी महाराज यांनी केले. हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील सर्व समाजांनी आनंद व उत्साहाने सहभागी होऊन विविधतेतील एकता आणि त्या एकतेतून देशाची अखंडता जगासमोर मांडावी, असेही त्यांनी नमूद केले. या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातून करण्यात आली आहे, असे महंत सुनिल महाराज यांनी सांगितले.
नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाबुराव राठोड यांनी केले. बंजारा समाजाने आपल्या प्राणांची आहुती देऊन शीख समाजाचे धर्मरक्षण केले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे गणेश राठोड यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भारतातील चार अखंड तख्तांपैकी नांदेड येथील श्री हजूर साहिब (गुरु गोविंदसिंग तख्त) हा एक महत्त्वाचा तख्त असल्याचे नमूद केले. हिंद दी चादर कार्यक्रमासाठी बस प्रवास, जेवण, वाहतूक, भोजन तसेच रथांच्या वाहतुकीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंगोली जिल्ह्यातून शीख समुदायाचा एक व बंजारा समाजाचा एक असे एकूण दोन जनजागृती रथ 350 व्या शहीदी समागमाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात फिरणार आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment