12 January, 2026
उद्योजकांनी निर्यात प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विविध संस्थांची भूमिका समजून घ्यावी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• महा-निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–२०२६ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
• एमएसएमई क्षेत्र बळकटीकरण व निर्यातवृद्धीस चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न
हिंगोली (जिमाका), दि. 12 : उद्योजकांनी निर्यात प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी बँका, पोस्ट ऑफिस, विमा कंपन्या, कंपनी मैत्री कक्ष, ईओडीबी, डीजीएफटी आदी संस्थांची भूमिका समजून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित उद्योजकांना केले.
राज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रम तसेच निर्यातवृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महा-निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026 अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज येथील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेस उद्योजक संघटनांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामडे, नंदु तोष्णीवाल, प्रविण सोनी, रमेश पंडित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, आर-सेटीचे संचालक हेमराज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागपूर येथील डीजीएफटीचे संकेत निनावे यांनी निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे, त्यांची तयारी व निर्यातक्षम वस्तू याबाबत सखोल मार्गदर्शन केले. भारतीय डाक विभागाच्या निर्यातीतील भूमिकेबाबत अधीक्षकीय डाक अधिकारी डॉ. संजय लिये यांनी माहिती देत हिंगोली जिल्ह्यात डाकघर निर्यात केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
एडीबीआय बँकेचे विवेक निर्वशवार यांनी बँकिंग सहाय्य व लघुउद्योजक निर्यातदार होण्याबाबत मार्गदर्शन केले. एसबीआयचे नोडल अधिकारी साईनाथ डोगंले व किरण चांदोरकर यांनी ऑनलाईन पद्धतीने एसबीआयची निर्यातविषयक भूमिका स्पष्ट केली. वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी निलेश देशमुख यांनी जिल्ह्यातील हळद संशोधनाबाबत माहिती दिली.
ईओडीबीचे नोडल अधिकारी आकाश ढगे यांनी उद्योग व निर्यात व्यापार सुलभ करण्याविषयी, तर कंपनी मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी श्री. हजारे यांनी उद्योगांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविल्या जातात याबाबत मार्गदर्शन केले. इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापक श्रीमती देशपांडे, अग्रणी बँक अधिकारी सुजित झोडगे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रविंद्र पत्की यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. पी. व्ही. मेंढे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर. एस. पत्की, विभागीय उद्योग अधिकारी जितेंद्र देशमुख, उद्योग निरीक्षक आर. एल. आहेर, अधीक्षक पी. व्ही. मेंढे, राहुल शेळके, सुधीर आठवले, सुभाष जाधव यांनी योगदान दिले.
या कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, निर्यातदार, निर्यातक्षम व नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह व वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उद्योग केंद्रे, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, संशोधक तसेच बँका व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी अशा 200 पेक्षा अधिक उद्योजकांची उपस्थिती होती.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment