13 January, 2026

बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या – शिबिरात जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. १३ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र, नाशिक व शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर चित्ता येथे आयोजित विशेष वार्षिक निवासी युवक शिबिरातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सत्रात बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रमुख व्याख्याते जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या असल्याचे सांगितले. बालविवाहाचा थेट परिणाम बालकांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक व सामाजिक विकासावर होत असून विशेषतः अल्पवयीन मुलींच्या आरोग्यावर, मातामृत्यू व बालमृत्यू दरावर तसेच शिक्षण व स्वावलंबनावर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या व्याख्याते ॲड. अनुराधा पंडित (कायदा तथा परिविक्षा अधिकारी) यांनी बालविवाह ही प्रथा भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व बालहक्कांच्या विरोधात असल्याचे नमूद केले. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार मुलीसाठी किमान वय १८ वर्षे व मुलासाठी २१ वर्षे निश्चित असून या वयापूर्वी होणारा विवाह हा दंडनीय गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी उपस्थितांना बाल विवाह प्रतिबंध कायद्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विशाल पाईकराव, शुभम सोनूळे, रितेश वाव्हळ, शुभम खंदारे, अश्रूजी खडसे, अवधूत जवादे, तेजस सरकटे, शेषराव कांबळे व अनिकेत धवसे यांनी बालविवाह विषयावर प्रभावी नाटिकेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील मनोहर पाईकराव होते. प्रमुख उपस्थितांमध्ये श्रीमती सरस्वती कोरडे, ॲड. अनुराधा पंडित, चाईल्ड लाईन केस वर्कर सुरज इंगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कांबळे, माजी विद्यार्थी गणेश कुबडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. किशोर इंगोले, प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे, डॉ. रामभाऊ भाकरे, प्रा. आशिष इंगळे, प्रा. संजय चव्हाण, सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष इंगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी केले. या कार्यक्रमास शिबिरार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: