13 January, 2026

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालयात विविध विषयांवर आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवक दिनानिमित्त राजे संभाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, हिंगोली येथे विविध विषयांवर मार्गदर्शनात्मक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे समन्वयक तथा दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वि. म. मानखैर हे होते. मार्गदर्शक म्हणून वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ एस. के. शिरसाठ आणि जिल्हा वकील संघाचे विधीज्ञ डी. बी. खंदारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य यू. एस. शेळके हे उपस्थित होते. या शिबिरामध्ये अँड. एस. के. शिरसाठ यांनी राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिनानिमित्त मानवी तस्करी व त्यावरील कायदे या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अँड. डी. बी. खंदारे यांनी राष्ट्रीय युवक दिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना तंबाखू व गुटखा सेवन न करण्याची शपथ दिली. अध्यक्षीय भाषणात वि. म. मानखैर यांनी तरुण युवक हे देशाचे उज्वल भविष्य असून त्यांनी स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय खेळांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, वाम मार्गापासून दूर राहावे तसेच शिस्तबद्ध व आज्ञाधारक जीवन जगावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. डी. सिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य यू. एस. शेळके यांनी केले. या शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समितीचे अतुल चाटे आदी उपस्थित होते. ******

No comments: