10 April, 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न





भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

        हिंगोली,दि.10: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत असून सप्ताहनिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली यांच्या सहकार्याने आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक समता सप्ताह निमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटनप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पपुजन करुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य बी. एस. केंद्रे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी डॉ. सी. के. कुलाल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता ज्ञानदेव गुठ्ठे यांची उपस्थिती  होती.
यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मोनिका भाऊराव चव्हाण यांच्यासह स्वत: रक्तदान  केले. तसेच यावेळी रवि खंदारे, व्हि. एन. खरडकर, बी. के. वाकळे, रणजीत भराडे, लक्ष्मण रणखांबे, सिध्दार्थ ढगे, भिमराव काशिदे, श्रीराम ठोंबरे, सदाशिव काशिदे, विश्वनाथ बिहाडे, नितिन कदम, सिध्दार्थ गोंवदे, सखाराम चव्हाण, संतोष होडबे, गजानन बिहाडे, राहुल कांबळे, प्रविण टोपरे, रावजी बलखंडे, सचिन सोळंके, धम्मदिप वानखेडे, हरिशंकर भुसारे, भागवत घोडेकर, लक्ष्मण भंडगे, गजानन सोनुळे, क्षितिज आठवले, नितिन राठोड, सचिन व्यास, किसन शिंदे आणि दत्तात्रय गिराम आदी ३१ रक्तदांत्यानी रक्तदान केले.
सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक इंगोले-समाता दुत यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नागनाथ नकाते यांनी केले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलीस निरीक्षक जगन गणपती पवार, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी  सिध्दार्थ गोवंदे, विशाल इंगोले तसेच शासकीय वसतिगृहातील गृहपाल व कर्मचारी आणि मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातील सर्व कर्मचारी आणि सामाजिक न्याय विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती. 
00000


09 April, 2018

त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याबाबत आवाहन


त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याबाबत आवाहन
        हिंगोली,दि.09: माहे एप्रिल -2018 या महिन्याच्या मासिक वेतन देयके दाखल करताना सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीचे माहे मार्च 2018 अखेरचे ई आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 30 एप्रिल 2018 पर्यंत भरावयाचे आहे तसेच या कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.in  वरुन ऑनलाईन ई आर 1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्विकारले जाणार नाहीत, याची संबंधित कार्यालयांनी नोंद घ्यावी. सर्व कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आय.डी. व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व  कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी, फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपले प्रोफाईल अपडेट करावी, असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी कळविले आहे .
0000

‘महामानवाला अभिवादन’ लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन




‘महामानवाला अभिवादन’ लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन

        हिंगोली, दि.09: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘महामानवाला अभिवादन’ हा लोकराज्यचा एप्रिल महिन्याचा विशेषांक तयार करण्यात आला असून या विशेषांकाचे प्रकाशन खासदार राजीव सातव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम, देशमुख यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी.सभागृहात करण्यात आले.
             माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ हा अंक अत्यंत वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा आहे. या विशेषांकामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. लोकराज्यचा हा विशेषांक वृत्तपत्र विक्रेते आणि जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

****

केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी - खासदार राजीव सातव



केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी
                                                                                - खासदार राजीव सातव
        हिंगोली,दि.09: केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार राजीव सातव यांनी दिले.
            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली यांचेवतीने आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार राजीव सातव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम, देशमुख आणि उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. सातव म्हणाले की, केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. परंतू या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याकरीता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत उपलब्ध निधीतील तरतुदीतून जिल्ह्यात योजना राबविण्यात येणे आवश्यक आहे. नरेगा अंतर्गत वैयक्तिक विहिरींची योजना राबविण्यात याव्यात. तसेच नरेगा अंतर्गत संबंधीत यंत्रणांनी पाणंद रस्ते आणि शौच खड्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावीत. विद्युत विभागाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत विद्यूत विभागाने जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील विज जोडणी करुन ज्या ठिकाणी ट्रॉन्सफार्मरची आवश्यकता आहे त्याठिकाणी त्वरीत ट्रॉन्सफार्मर बसविण्याची कार्यवाही करावी.  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देवून कामे पूर्ण करण्याच्या सूचना. खासदार राजीव सातव यांनी यावेळी दिल्या.
            आमदार श्री. मुटकुळे म्हणाले की, यंत्रणांनी दिलेले कामे नियोजन करुन वेळेत पूर्ण करावीत. म्हणजे प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होईल. तसेच विकास कामे प्रलंबित न ठेवता पाठपुरावा करुन सदर कामे पूर्ण करावीत.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि केंद्र पुरस्कृत योजना जिल्ह्यात राबवितांना सर्व संबंधीत यंत्रणांनी समन्वय ठेवून विकास कामे वेळेत पूर्ण करावीत.
            यावेळी खासदार सातव यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम निर्मल भारत अभियान, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना, इंदिरा आवास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना यासह अन्य केंद्रशासन पुरस्कृत योजनांचा प्रगतीचा आढावा घेतला.
            यावेळी जिह्यातील पंचायत समितीचे सभापती, समितीचे अशासकीय अध्यक्ष, विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.

****


08 April, 2018


समाजात समता, स्वातंत्र्य व बंधुत्व रूजवीण्याचा प्रयत्न करावा
                                                    - आमदार तान्हाजी मुटकुळे

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन*

          हिंगोली,दि.8: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले असून, सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
            येथील सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटन आमदार मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती सुजाता पाटील, जात पडताळणी उपायुक्त भारत केंद्रे, जात पडताळणी समिती सदस्य सचिव श्रीमती छाया कुलाल, दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर, बबन मोरे, बबन शिखरे, दत्ताराव पाटोळे आणि समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण उपस्थित होते.
            श्री. मुटकुळे पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणे व गांभीर्याने नमुद केली आहे. कलम 46 मध्ये ‘राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्यायावर सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे सरंक्षण करील’ असे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना समानतेचा हक्क प्राप्त करुन दिला आहे.  नागरिकांनी समाजातील सर्व व्यक्तींना समतेची वागणूक देवून समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. समाजाचे मागासलेपण हे अज्ञानामुळे आहे हे ओळखूनच त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. अनुसूचित जाती व सर्वप्रकारचे पिडित, शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. या सप्ताहच्या निमित्त शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविल्यास त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होण्यास मदत होईल, असेही श्री. मुटकुळे यावेळी म्हणाले. 
            यावेळी पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती सुजाता पाटील, बबन शिखरे आणि दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार  यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविकात समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण म्हणाले की, राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असून, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलभूत अधिकाराची जाणीव असणे आवयश्यक असून जीवनात प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे संचालन श्री. इंगोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. वागतकर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, सर्व महामंडळाचे अधिकरी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*****

07 April, 2018

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहचे आयोजन


समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहचे आयोजन
        हिंगोली, दि.07 : भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंती  निमित्य दरवर्षी  दिनांक 08 एप्रिल  ते  14 एप्रिल  सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दिनांक 08 एप्रिल 2018 ते 14 एप्रिल 2018 या कालावधीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
       दिनांक 08 एप्रिल 2018 रोजी  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हिंगोली येथे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
            दिनांक 09 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 10 एप्रिल, 2018 रोजी जिल्हास्तावर रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी  क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2018 रोजी सामाजिक न्याय व सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व त्या अंतर्गत कर्जाचे वाटप याबाबत लाभार्थ्याना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. दिनांक 12 एप्रिल 2018 रोजी  सर्व शासकीय कार्यालयामध्ये व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्त्यामध्ये स्वयंसेवी संस्थाच्या साह्याने स्वच्छता अभियान राबवायचे  आहे. दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी जिल्ह्यातील विचारवंत, नामवंत, पत्रकार, लोक कलावंत तसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे व व्याख्यानाचे  आयोजन करण्यात येणार आहे.
            तसेच दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी 08:50 वा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलाआहे.
        जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिकांनी या सामाजिक समता सप्ताहमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

0000