25 January, 2020

कर्जमुक्ती योजनेची शेतकरी बांधवांना वेळेत लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा -- पालकमंत्री वर्षा गायकवाड


कर्जमुक्ती योजनेची शेतकरी बांधवांना वेळेत लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा
                                                                                         -- पालकमंत्री वर्षा गायकवाड

        हिंगोली, दि.25: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केलेल्या  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळावा याकरीता प्रशासनाने प्रयत्न करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करण्यासाठी सहज, सोपी आणि पारदर्शक अशी "महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" या योजनेची शासनाने घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेच्या कर्जखात्याशी संलग्न करुन त्याचे प्रमाणिकरण करुन घेण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री यांनी जिल्ह्यात रब्बी हंगामात पीक निहाय व तालूका निहाय पेरणीचा आढावा घेतला. तसेच अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेले अनुदान आणि मागणी केलेल्या अनुदानाबाबत माहिती घेतली. तसेच बँकांच्या शेतीपूरक उद्योगासाठी काही योजना आहे का याबाबत विचारणा केली. जिल्ह्यात नवीन उद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बँकांनी उद्योग उभारणी कर्जयोजना सुरु करता येईल का याचा अभ्यास करावा, असे ही त्या म्हणाल्या.
आपल्या जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी मोठी संधी आहे. याकरीता आपण सर्वजण मिळून चांगले काम करु अशी अपेक्षा ही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****

जिल्हा वार्षिक योजनेच्या 171.70 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता


जिल्हा वार्षिक योजनेच्या 171.70 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता



हिंगोली, दि.25: जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन 2020-21 या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी 356 कोटी 59 लाख 15 हजार एवढी मागणी केली असता जिल्हा नियोजन समितीने प्रत्यक्ष 171 कोटी 70 लाख 51 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यात भारनियमन चालु असताना महावितरण विभागांनी शेतकऱ्यांची अडवणुक न करता त्यांना तात्काळ रोहित्र उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच ऑईल अभावी बंद पडलेले रोहित्रांची दुरुस्ती करुन जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याबाबत महावितरण विभागांने दक्षता घ्यावी. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहीका खरेदी करण्यात यावी. ज्या शाळेत स्वच्छतागृह नसेल त्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारावी. तसेच नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, अशा ही सूचना पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.
 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, स्वच्छ भारत अभियानासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. यावेळी तसेच सन 2019-20 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. तसेच सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, स्वच्छ भारत अभियान आदीबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. तसेच सर्व संबंधीत विभागांनी सन 2019-20 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचना ही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
सन 2020-21 अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता 101 कोटी 68 लाख तर अनुसूचित जाती उपयोजनाकरीता 51 कोटी 90 लाख आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत 18 कोटी 12 लाख 51 हजार अशा एकुण 171 कोटी 70 लाख 51 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना 2019-2020 अंतर्गत डिसेंबर 2019 अखेर झालेल्या खर्चाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. सर्वसाधारण योजने अंतर्गत 54 कोटी 56 लाख 92 हजार रुपये तर अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत 16 कोटी 19 लाख 4 हजार रुपये खर्च झाला आणि अनुसूचित जमाती आदिवासी  उपयोजनेतंर्गत (ओटीएसपी) 5 कोटी 73 लाख 87 हजार रुपये खर्च झाला आहे.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी ही अनुसूचित जमाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला. यावेळी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.
*****



युवक आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करा
--   पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली,दि.25:  जिल्ह्यातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता बँकांनी त्यांच्यासाठी उद्योगाशी संबंधीत कर्जयोजना सुरु करुन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करावे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या .
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, युवाशक्ती हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे असून त्यांनी उद्योग उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. परंतु त्यासाठी नौकरीबाबतची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज  उद्योगाची अनेक दालने खुली असून जिल्ह्यातील युवक आणि महिलांनी उद्योग सुरु करून विविध क्षेत्रात आपल्या जिल्ह्यात उद्योग संस्कृती निर्माण करावी. कोणताही उद्योग सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. याकरीता बँकांनी उद्योग विषयक कर्ज योजना सुरु करुन जिल्ह्यातील युवक आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

*****

24 January, 2020



प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करणे आवश्यक
-          जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली,दि.24: लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ निमित्त्‍ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी राजु नंदकर, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, तहसिलदार श्री. खंडागळे, पोलीस निरिक्षक श्रीमनवार आणि श्री. सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
श्री. जयवंशी म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकांस निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. यामध्ये स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळाले आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून याची जाणिव झाल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही. शासनाकडून आपण ज्या अपेक्षा करत असतो, त्यांची पूर्ततेसाठी आपण मतदान करणे हे कर्तव्य ठरते. याकरीता राज्यघटनेने दिलेला हा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या एका मतामुळे काय फरक पडणार, असा विचार करुन अनेक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत नाही. पण आपल्या एका मताने ही फरक पडू शकतो, हे लक्षात घेतले, तर मतदानाचे महत्व सर्वांना कळेल. देशात सशक्त लोकशाही हवी असेल, तर मतदानाशिवाय पर्याय नाही. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. याकरीता 18 ते 20 वयोगटातील युवकांनी पुढाकार घेवून आपली मतदार नोंदणी करावी. तसेच याबाबत समाजमध्ये जनजागृती ही करावी.
निवडणूकीमध्ये बीएलओ (बुथ लेवल ऑफिसर) हे अत्यंत महत्वाचा भाग असून यांच्याशिवाय निवडणुक प्रक्रिया यशस्वी पार पाडणे शक्य नाही. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी हे बीएलओच उपलब्ध करुन देतात. सद्या भारत निवडणुक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम बीएलोमार्फत राबविण्याची मोहिम हाती घेतली असून 13 फेब्रूवारी 2020 पर्यंत ही पडताळणी होणार आहे. आपल्या जिल्ह्यातील बीएलओंनी आतापर्यंत 69 टक्के पडताळणीचे काम पूर्ण केले असून याबाबतीत आपला जिल्हा राज्यात प्रथम असून हे फक्त बीएलओमुळे शक्य झाले आहे. याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या बीएलओंचा आज सत्कार करण्यात येणार असून त्यांचे मी अभिनंदन करतो असे जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगाबाबत मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिणियार म्हणाले की, 25 जानेवारी, 1950 निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकीविषयक सर्व कामकाज निवडणूक आयोग करते. तीन सदस्यी निवडणूक आयोगाची रचना आहे. मतदार याद्या तयार करणे, मतदारांची पडताळणी करणे, मतदार ओळख पत्र देणे, अचारसंहिता लागू करणे, नामाकंन, नामाकंनाची छाननी, मतदान घेणे, मतमोजणी करणे, निवणुक निकाल जाहिर करणे ही महत्वाची  कार्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात येतात.
तर भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगर पालिका, नगर परिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. संविधानातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन’ याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असल्याची माहिती दिली.
तसेच 18 ते 20 वयोगटातील युवकांनी आपली मतदार नोंदणी करण्याची आवाहन करत Voter Helpline या मोबाईल ॲपद्वारे देखील मतदार नोंदणी करता येते अशी माहिती श्री. मिणियार यांनी यावेळी दिली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर प्रास्ताविकात म्हणाले की, 25 जानेवारी 1950 रोजी आयोगाची स्थापना झाल्याने सन 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा केला जातो. नुकत्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या.  तसेच सद्या आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार पडताळणी कार्यक्रमात आपला जिल्हा राज्यात प्रथम आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत उल्लेखनीय कार्य केलेले बीएलओ यु. एन. तोरकड, प्रताप दशरथे, एस. डी. भस्के, एस. पी. बनसोडे, एस. बी. टेहरे, एस. जी. माहोरे, वाय. सी. पारसकर, व्ही. यु. हलगे, एस. एन. नाईक, एस.टी. रामदिनेवार, एस. एस. रामोड, आर. एच. वाठोरे, जी. बी. पायघन, ए. वाय. बिल्लारी, जी. आर. क्षिरसागर आणि गजानन नायकवाल यांचा यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.गायत्री वाकडे, कु. कांचन वाकडे यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच नवमतदारांना यावेळी प्रातिनीधीक स्वरुपात मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मतदानाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी कार्यक्रमात शाहीर श्री. दांडेकर यांनी सादर केलेल्या मतदार जनजागृतीपर गीतांनी कार्यक्रमात बहार आणली.
कार्यक्रमास यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, बीएलओ, प्राध्यापक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश येवले यांनी केले तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी आभार मानले.

****


पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.24 : राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री  प्रा.वर्षा गायकवाड या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी  दुपारी 1.00 वाजता  कार्यकारी समितीची बैठक व जिल्हा नियोजन समितीची बैठक (स्थळ: जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), दुपारी  2.00 वाजता रब्बी पिक पाहणी आढावा बैठक (स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली),  दुपारी 3.00 वाजता अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शासकीय मदत वाटप (स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), दुपारी 4.00 वाजता कर्जमाफी  आढावा/ बँकेना मिळालेली हमी (स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), दुपारी 5.00 वाजता पुनर्गठीत कर्जाबाबत बँकांची कार्यवाही व सद्य:स्थिती (स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), सायंकाळी 6.00 वाजता शिव भोजन थाळी (स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), बैठकीनंतर राखीव (शासकीय विश्रामगृह, हिंगोली), सोयीनुसार हिंगोली येथून कळमनुरीकडे मोटारीने प्रयाण. प्रियदर्शिनी सेवा संस्था कळमनुरी च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती, सोयीनुसार हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम.
            रविवार, दिनांक 26 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 7.40 वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शिवाजी नगर, हिंगोली येथे सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन कार्यक्रमास उपस्थिती., सकाळी 9.15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन राष्ट्रध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : संत नामदेव, पोलीस कवायत मैदान, हिंगोली), कार्यक्रमानंतर मोटारीने धर्माबाद/ बासरकडे प्रयाण करतील.
000000

दहा रुपयात शिवभोजन ·प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजनेची सुरुवात


दहा रुपयात शिवभोजन
·        प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजनेची सुरुवात


           राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे अवघ्या दहा रुपयांत शिवभोजन थाळी येत्या प्रजासत्ताक दिनापासून शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात कोणीही भुकेले राहू नये, यासाठी शासनाने शिवभोजन योजना आणली आहे. शासनाच्या या क्रांतीकारी निर्णयामुळे गरीब आणि गरजू लोकांची दुपारच्या भोजनाची सोय होणार आहे.

              
महाराष्ट्र शासनाने अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले त्यामध्ये दहा रुपयांत शिवभोजन थाळी योजनेंचा आवर्जून उल्लेख करायला हवा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ही महत्वाकांक्षी योजना असून मंत्रीमंडळ बैठकीमध्ये दहा रुपयांत शिवभोजन थाळी ही महत्वाकांक्षी योजना जाहीर करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वचनपूर्तीच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.  येत्या प्रजासत्ताक दिनापासून  संपूर्ण   राज्यात  प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्यात 50 ठिकाणी ही योजना सुरु होत असून प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर होत आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागातही राबविण्यात येणार आहे.  स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्चितच यशस्वी होईल, हे मात्र निश्चित !
गरीब आणि गरजू जनतेला विशेषत: ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी हीच ती शिवभोजन थाळी योजना आहे. शिवभोजन थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा भात आणि 100 ग्रॅमचे एक वाटी वरण दररोज दुपारी 12 ते 2 यावेळेत उपलब्ध होईल, या येाजनेंतर्गत हिंगोलीमध्ये 200  शिवभोजन थाळी उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड  यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ  रविवार दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात होत आहे. सर्वसामान्य आणि गोरगरीबांना अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण मिळणार असल्याने ही योजना जिल्हयातील जनतेसाठी उपयुक्तच  ठरेल.
राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात म्हणजे केवळ दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देणारी योजना योग्य पध्दतीने राबविली जावी यासाठी शासनाने  दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे तर 23 जानेवारी 2020 रोजी एका शासन निर्णयाद्वारे आवश्यक निधीच्या वितरणाबाबत आदेशही पारित केले आहेत. दहा रुपयांत शिवभोजन थाळी या योजनेसाठी सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी म्हणजे तीन महिन्यासाठी जवळपास साडेसहा कोटीचा निधी वित्त विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. दहा रुपयांत शिवभोजन थाळी योजनेसाठी शासनाने मंजुर केलेला निधी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात प्रतिथाळी पन्नास रुपये तर ग्रामीण भागात पस्तीस रुपये इतकी राहील, प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊन त्यांच्यामार्फत जिल्हास्तरीय समितीने ठरविलेल्या खानावळ, NGO, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांना संबंधितांना वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत.
शिवभोजन थाळी योजनेंतर्गत पहिल्या टप्यात जिल्हा मुख्यालय परिसर, जिल्हा रुग्णालय, बस तसेच रेल्वे स्थानक, नगरपरिषद परिसर, बाजारपेठा अशा गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी या योजनेंतर्गत भोजनालये सुरु करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती नसून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असे तूर्त सूत्र राहणार आहे. प्रत्येक भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तीना जेवणासाठी बसता यावे, अशी व्यवस्था असणार आहे. भोजनालयात अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वच्छ पाणी वापरले जाणार असून स्वच्छ टेबल-खुर्च्या तसेच स्वयंपाकगृहात खाद्यपदार्थ तयार करतांना प्रदुषण होणार नाही, याचीही खबरदारी भोजनालय चालकावर राहील.
महाराष्ट्र शासनाची विशेषत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्वाकांक्षी असलेली योजना प्रत्यक्षपणे येत्या प्रजासत्ताक दिनापासून  संपूर्ण   राज्यात  पहिल्या टप्यात प्रायोगिक तत्वावर सुरु होत आहे. राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना केवळ दहा रुपयांत स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन मिळणार असल्याने ही योजना गरीब आणि गरजूंसाठी वरदान ठरेल, हे मात्र निश्चित !

                                                                             -- अरुण सूर्यवंशी
                                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी,
          हिंगोली
********

मतदार जागृतीकरीता : राष्ट्रीय मतदार दिवस



मतदार जागृतीकरीता : राष्ट्रीय मतदार दिवस 
            भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली असून स्थापनेचा 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग  नोंदवता यावा हा आहे.
            भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नांव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भरतीय नागरिकाला आहे.
            भारतातील युवा मतदाराना सक्रीय राजनीती मध्ये भाग घेण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिलेले आहेत.  या 10 राष्ट्रीय मतदार दिवसासाठी आयोगाने मतदानासाठी सज्ज मतदार असल्याचा अभिमान हे घोषवाक्य निश्चित केले आहे.
            देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची जाणीव होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. या 'राष्ट्रीय मतदार दिवस' निमित्त 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या दिनांक 1 जानेवारी, 2020 च्या अर्हता दिनाकांवर 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत नांव नोंदविले नाही अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येते.
            दिनांक: 01 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर अधारीत आज रोजी मतदार यादीनुसार हिंगोली जिल्ह्यात तीन  मतदार संघामध्ये एकूण 9 लाख 9 हजार 816 मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार 4 लाख 34 हजार 277 तर पुरुष मतदार 4 लाख 75 हजार 340 आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. कारण जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी मतदार यादीत नांव नोंदविले नाही त्यांनी आता या कार्यक्रमानिमित्त महिला मतदारांनी नावे नोंदविली पाहिजेत.
            हिंगोली जिल्ह्यात 01 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 अंतर्गत दिनांक 15 जुलै, 2019 ते 30 जुलै 2019 या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात आल्या. पुन:रिक्षण कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एकूण 11 हजार 357 दावे हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 10 हजार 139 निकाली काढण्यात आले आहेत.  राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2020 रोजीच्या भारत निवडणूक आयोगाने नव्यानेच जारी केलेले स्मार्टसाइज प्लॅस्टीक मतदार ओळखपत्राचे (PVC-EPIC) वाटप त्या-त्या मतदान केंद्राचे ठिकाणी संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत करण्यात येणार आहेत.
            हिंगोली जिल्ह्याची सन-2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 11 लाख 77 हजार 345 इतकी असून ऑक्टोबर, 2017 ची अनुमानित (Projected) लोकसंख्या 12 लाख 44 हजार 379 इतकी आहे.  त्यामध्ये एकूण मतदार 8 लाख 78 हजार 129 मतदार आहेत. लोकसंख्येशी मतदाराचे प्रमाण 70.56 टक्के आहे. मतदारांनी आपले नाव अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी.
            वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या अधिकाधिक तरूणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा सततचा पुनरिक्षण कार्यक्रम- 2020 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)/ संबंधीत तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या मतदार दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नवीन मतदारांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले, प्रदान करुन प्रतिज्ञा दिली जाणार आहे. निबंध स्पर्धा, सायकल रॅली, पथनाट्य जागृती अभियान, लोककला लोकनृत्य, प्रदर्शन, फलक, घोषवाक्य, सामान्यज्ञान स्पर्धा छायाचित्र स्पर्धा, सांस्कृतिक मंडळे, भजन मंडळे, महिला युवा मंडळे, महिला क्रीडा मंडळे, बचत गट, या संस्थांच्या मदतीने, जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवसाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
            येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण आपल्या लोक प्रतिनीधीस मतदान करण्याची संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय मतदार दिवसानिमत्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या !
                                                                        -- अरुण सूर्यवंशी
                                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी,
    हिंगोली
********