27 March, 2023

 

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसभर वीज उपलब्ध

 

ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा मानल्या जातात. त्याप्रमाणे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऊर्जेची गरजही आता मूलभूत गरज बनली आहे. पारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु आपल्याकडे अपारंपरिक ऊर्जास्रोत देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा वापर होणे ही काळाची गरज बनली आहे. दिवसेंदिवस ऊर्जेची गरज वाढत असल्याने या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे आज अनिवार्य ठरत आहे. ऊर्जेचा पुरवठा आणि मागणी यात समन्वय साधने गरजेचे आहे. आजच्या काळात ऊर्जेशिवाय कोणतीही गोष्ट अशक्य असून, राज्याला भारनियमनमुक्त करण्यासाठी इतर ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे ही आजची गरज बनली आहे. राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 30 टक्के ऊर्जेचा वापर केला जातो. राज्यातल्या शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा यादृष्टीने शासनस्तरावर नेहमी प्रयत्न होत असतात. शेतकरी आणि शेती केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंमलात आणली आहे.

राज्य शासनाने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत 1 लाख सौर कृषी वाहिनी देण्याचे उदिष्ट ठेवले आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत महावितरणने 4 हजार 855 शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीचा लाभ दिला आहे.  शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना शेतीकरिता दिवसभर वीज उपलब्ध होत आहे. तसेच महावितरणकडे पारंपरिक वीज जोडणीसाठी ज्या शेतकरी लाभार्थ्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यांना सौर कृषी वाहिनी जोडणीचा पर्याय महावितरणतर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

राज्यात सौरऊर्जा मुबलक प्रमाणात  उपलब्ध असून त्याचा प्रभावी वापर केल्यास विजेची वाढती मागणी पूर्ण होऊन आपण स्वयंपूर्ण होत आहोत. या योजनेमुळे शेतकऱ्याला दिवसभर वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. शेतीसाठी ही योजना प्रभावी ठरत असून, यामुळे पर्यावरण समृद्धीलाही मदत होत आहे. सौरऊर्जेचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन आणि शेती सुजलाम-सुफलाम करण्याचा शासनाचा प्रयत्न कृषी विकासाला नवे आयाम देणारा ठरत आहे.

 

                                                                                    संकलन :  जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

****

26 March, 2023

 

जिल्हा कृषि महोत्सवाचा तिसरा दिवस हळद या पिकासाठी समर्पित

चर्चासत्र व परिसंवादाचा लाभ घेण्याचे आवाहन

·         आज तृणधान्य व हळद या विषयावरील चर्चासत्र संपन्न

 

                          हिंगोली (जिमाका), दि. 26  :  जिल्हा कृषि महोत्सचा दि. 27 मार्च 2023 रोजी  प्रदर्शनाचा तिसरा दिवस आहे. दि. 27 मार्च हा संपूर्ण दिवस हळद या पिकासाठी समर्पित आहे. यामध्ये हळद पिकासाठी जमिनीचे आरोग्य या विषयावर डॉ. कौसडीकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत हळद पिकाचे मार्केटिंग कसे करावे याचे अनुभव कथन प्रल्हाद बोरगड हे करणार आहेत. हळदीमध्ये विक्रमी उत्पादन घेणारे कळमनुरी तालुक्यातील नितीन चव्हाण हे आपली यशोगाथा सादर करणार आहेत. नव्याने  विकसित होत असलेल्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरावर गरुडा ॲरो स्पेसचे इंजिनियर आदित्य तटके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्राचा समारोप महाराष्ट्र कृषि पणन मंडळ मार्फत आयोजित खरेदीदार विक्रेता संम्मेलन याने होणार आहे. चर्चासत्राचे आयोजन मुख्य दालनामध्ये दृक-श्राव्य माध्यमाद्वारे करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतऱ्यांना प्रदर्शनाचे स्टॉल पाहत-पाहत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी  प्रदर्शन स्टॉलमध्ये मेगा फोनद्वारा व्याख्यानाचे प्रसारण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मुख्य दालनामध्येही बैठक व्यवस्था केलेली असून त्या ठिकाणी बसून या चर्चासत्र व परिसंवादाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  विशेषत: हळद उत्पादकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन घ्यावा, असे आवाहन युवराज शहारे,  प्रकल्प संचालक, आत्मा, हिंगोली यांनी केले आहे. या चर्चासत्रामध्ये होणारी व्याख्याने यूट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  चर्चासत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून लोकशाहीर श्यामभाऊ वानखेडे यांचा लोकजागराचा पंचरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचाही लाभ  हिंगोली  परिसरातील  नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा कृषि महोत्सवामध्ये आज दि. 26 मार्च, 2023 रोजी तृणधान्य, हळद या विषयावरील चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या श्रीमती रोहिणी शिंदे यांनी तृणधान्य पिकावरील प्रक्रिया उद्योग व त्यांची प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेशी सांगड या विषयावर मार्गदर्शन केले. दत्तगुरु फार्मर प्रोडयुसर कंपनीचे संचालक  गंगाधर श्रृगांरे यांनी कंपनीची स्थापना तसेच कंपनीद्वारे शेतकऱ्यांना विपणनामध्ये करण्यात येत असणारे बदल या विषयी आलेले अनुभव कथन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रा.अनिल ओळंबे यांनी कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच हळद पिकाची लागवड व त्यामध्ये शेतकऱ्यांनी हाती घ्यावयाचे उपक्रम या विषयी सखोल मार्गदर्शन केले. वर्धा जिल्ह्यातील वायगांव हळदीवर उल्लेखनीय काम केलेले मनोज गायधने यांचे हळद लागवड, त्याचे भौगोलिक मानांकन व प्रभावी विपणन या विषयी मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील शास्त्रज्ञ एल.एन जावळे यांनी खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी पिक लागवड व विकसित केलेल्या सुधारित वाणाची  माहिती  दिली. तसेच श्री. कल्याणकर यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर आपले विचार मांडले. तृणधान्यवर्गीय पिकाचे वैरण प्रक्रिया व महत्व या विषयावर निकृष्ट  दर्जाच्या वैरणीचे पौष्टिक वैरणीमध्ये रुपांतर करण्याबाबत कृषि विज्ञान केंद्राचे  कैलास गिते यांनी मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे राजेश भालेराव यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.

आज झालेल्या वरील चर्चासत्रात शेतकऱ्यांचा कालापव्यय होऊ नये म्हणून चर्चासत्राचे प्रसारण प्रदर्शन स्थळी मांडलेल्या स्टॉलमध्ये सुध्दा मेगा फोनच्या द्वारे करण्यात आले आहे. मेगा फोनच्या माध्यमातुन स्टॉलमध्ये उपस्थित शेतकऱ्यांनी सुध्दा चर्चा सत्रातील व्यक्त्यांच्या मार्गदर्शनाचा स्टॉल पाहत-पाहत लाभ घेतला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुध्दा शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवाला मोठ्या संख्येने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सांयकाळी 5.00 वाजेपपर्यंत झालेल्या नोंदणी नुसार 850 पेक्षा अधिक लोकांनी प्रदर्शनास भेट दिली आहे. तसेच नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुध्दा 800 पेक्षा अधिक असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

*****

 

शेततळे अस्तरीकरणामुळे गंगाधर गायकवाड

यांना मिळाला पाण्याचा शाश्वत स्त्रोत

 



            शेती  उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे” योजना राबविण्यात येत आहे.

हिंगोली तालुक्यातील राहोली बु. येथील रहिवासी गंगाधर किशनराव गायकवाड यांची मौजे राहोली बु. येथे गट क्र. 117 मध्ये गावालगत 1.28 हेक्टर जमीन आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून गंगाधर गायकवाड यांना सन 2017-18 मध्ये 30×25×3 या आकाराचे शेततळे मंजूर झाले होते. त्यांना शेततळ्यासाठी 49 हजार रुपये अनुदान मिळाले होते. या अनुदानातून श्री. गायकवाड यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतून त्यांच्या शेतात शेततळे घेतले होते.

त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या बोअरवेलद्वारे शेततळ्यामध्ये पाणी सोडत होते. परंतु बोअरवेलला रब्बी हंगामामध्ये कमी पाणी असल्याने पिकांना पाण्याची कमतरता पडत होती. त्यामुळे उत्पन्नात दरवर्षी घट येत असल्याने त्यांचे नुकसान होत होते.

गंगाधर गायकवाड यांना हिंगोलीचे तालुका कृषि अधिकारी बालाजी गाडगे यांच्याकडून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत त्यांच्याकडे असलेल्या शेततळ्यामध्ये अस्तरीकरण केल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यास मदत होईल असे मार्गदर्शन मिळताच गंगाधर गायकवाड यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये शेततळे अस्तरीकरण या बाबीसाठी 2020-21 मध्ये अर्ज केला. त्यांना शेततळे अस्तरीकरणासाठी 67 हजार 728 रुपये अनुदानही मिळाले होते. या अनुदानातून श्री. गंगाधर गायकवाड यांनी शेततळ्याला पॉलीथीन अस्तरीकरण प्रक्रिया पूर्ण केली.

            शेततळ्यात अस्तरीकरण केल्यामुळे खरीप हंगामात काही पाणी पावसामुळे व उर्वरित पाणी हे त्यांच्याकडे असलेल्या बोअरवेल मधून शेततळ्यात साठवले आहे. या पाण्याचा वापर करुन आजमितीला रब्बीमध्ये हरभरा पीक, खरीप व रब्बीत हळद या पिकाला पाणी देण्यासाठी त्याचा चांगला वापर होत असल्याचे सांगितले. सध्या श्री. गायकवाड यांच्या शेतात हळद पीक जोमदार आणि चांगले उत्पन्न मिळेल या अवस्थेत आहे. त्यापासून एकरी अंदाजे 25 ते 30 क्विंटल हळदीचे उत्पन्न होणे अपेक्षित आहे. तसेच त्यांनी यावर्षी संत्रा या फळबाग पिकांची लागवड करणार असल्याचे देखील सांगितले.

            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून घेतलेल्या शेततळे अस्तरीकरण या घटकाच्या लाभामुळे गंगाधर गायकवाड यांच्या शेतात पाण्याचा एक शाश्वत स्त्रोत निर्माण होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी कृषि विभागाचे शतश: आभार मानले.

            कृषि विभागाच्या वतीने पाईप, मोटार, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण इत्यादी घटकाचा योजनेत समावेश केलेला आहे. त्याचा सर्व शेतकरी सभासदांना चांगला फायदा होत आहे. सध्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी इतर बाबीप्रमाणे या प्रकल्पात तारकुंपण या घटकाचा समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

            महाराष्ट्र शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात मागेल त्याला शेततळे योजनेचा व्यापक विस्तार केला आहे. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर या योजनेवर एक हजार कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे याचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

                                                                                                       --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                             माहिती सहायक

                                                                                                             जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

****

 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य पाककला स्पर्धाचे आयोजन

 

 

                    हिंगोली (जिमाका), दि. 26  :  आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करुन लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

        त्यामुळे ज्वारी व बाजरी पासून तयार होणाऱ्या पदार्थाच्या पाककला स्पधे्रचे आयोजन करण्यात आले आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्यांपैकी हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी पासून बनणाऱ्या विविध पदार्थाची महिलांसाठी पाककला स्पर्धा दि. 28 मार्च, 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

        येथील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषि महोत्सवातील स्टॉल क्र. 54 वर सहभागासाठी इच्छुक महिलांची नावे नोंदवावीत. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाना बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

कृषि महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध चर्चासत्राचा शेतकऱ्यांनी घेतला लाभ

 

 






                    हिंगोली (जिमाका), दि. 26  :  येथील रामलीला मैदानावर दि. 25 ते 28 मार्च, 2023 या कालावधीत आयोजित चार दिवशीय जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 25 मार्च रोजी करण्यात आले. कृषि महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. 25 मार्च रोजी दुपारच्या सत्रात शिवसांब लाडके यांनी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत असून पार्श्वभूमी, ज्वारी  व भरड धान्याचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन केले. तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. भालेराव यांनी ज्वारी व कडधान्य पिकाचे संशोधन, उत्पादन व महत्व याविषयी मार्गदर्शन केले. अजयकुमार सुगावे यांनी पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक विद्यापिठाचे प्रा. गडदे यांनी गळीत धान्य पिकाच्या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी गोविंद बंटेवाड यांनी या तांत्रिक चर्चासत्राचे आभार प्रदर्शन केले.

        सांयकाळी  सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पंकजपाल महाराज यांचे शेतीशी निगडीत प्रबोधन सादर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमास शेतकऱ्यांनी  उपस्थित राहून  लाभ  घेतला आहे.

 

*****

 

नदीला गतवैभव प्राप्त करुन देण्याची गरज

                                                                                    - अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 





        हिंगोली (जिमाका), दि. 26 :  नदीचे पुनरजीवन करण्यासाठी शासन, प्रशासन व लोकसहभागाच्या माध्यमातून आराखडा तयार करुन नदीला गतवैभव प्राप्त करुन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.

            कयाधू नदी नदी संवाद यात्रेचा कार्यक्रम आज हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चला जाणूया नदी राज्य समितीचे सदस्य तथा उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, जिल्हास्तरीय चला जाणूया नदी समितीचे सदस्य जलप्रेमी डॉ.संजय नाकाडे, सरपंच आसिफ खान पठाण, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी भोजे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी म्हणाले, चला जाणूया नदीला ही नदी जनसंवाद यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये 11 मार्च पासून शिरड शहापूर येथून सुरु झाली आहे. आज नरसी नामदेव येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. नामदेव महाराजाच्या वास्तव्याने पावन झालेल्या कयाधू नदीचे पुनरजीवन करण्यासाठी ही नदी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे शासन, प्रशासनासोबतच स्वंयसेवी संस्थाव लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांचे अनुभवाचा वापर करुन नदीला पुनरजिवित करण्यासाठी आराखडा तयार करावा व नदीचे पुनरजीवन करण्यासाठी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. शासनामार्फत वृक्ष लागवड, नदीचे खोलीकरण यासह वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे सांगितले.

जलप्रेमी डॉ. संजय नाकाडे यांनी नदीला जीवनदायिनी, जीवनवाहिनी  बनविण्यासाठी आपल्या हृदयात ठेवून तिचा विकास केला पाहिजे. पाच पाटील या माध्यमातून तरुणाची फौज तयार करुन नदीला वाचवण्यासाठी आराखडा तयार करावा. नदीच्या बाजूने महावृक्ष म्हणजे वटवृक्ष लावावेत. त्यामुळे हे पाणी धरुन ठेवते व जमिनीची धूप कमी होते. वन संस्कृती वाढायला लागते. यासाठी आपल्याला सहकार्य करत आहे.  त्यामुळे आपण नदीचे महत्व जाणून नदीला पुनरजिवित करण्यासाठी सर्वांनी पुढे यावेत, असे आवाहन केले. 

            विस्तार अधिकारी श्री. भोजे यांनी नदी पुरजिवित करण्यासाठी आराखडा तयार करण्याची गरज आहे. नवसंकल्पनावर आधारित काम करण्याची गरज आहे. तसेच पर्यावरण टिकवण्यासाठी हर घर नर्सरी अभियान राबवावा, असे सांगितले.

            यावेळी बोलताना जयाजी पाईकराव यांनी नदी अविरत झाली पाहिजे, नदी स्वच्छ, प्रदमुषण मुक्त, शोषणमुक्त, अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच हिंगोली संत नामदेवाचे तीर्थस्थान असलेले पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी लोक येतात. त्यामुळे अस्थी विसर्जन नदी ऐवजी एक जलकुंड बांधून त्यामध्ये केले तर नदीमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच नरसी नामदेव गावातील घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. गावाचे सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. या माध्यमातून संत नामदेवाच्या शिकवणीप्रमाणे वागणारे गाव असल्याची प्रतिमा निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात हरिभाऊ पटेबहादूर यांनी जनसंवाद यात्रेचा उद्देश, रुपरेषा व आढावा मांडला. विलास आठवले, उपसरंपच ज्ञानेश्वर कीर्तनकार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पाणी आणि सामाजिक विषयावर शाहीर धम्मानंद इंगोले, गायिका सुनिता रणवीर, दुर्गाताई इंगोले व संच यांनी प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विकास कांबळे यांनी केले. तर ग्रामसेवक ज्ञानेश्वर मालवड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव, सिध्दार्थ निनोले, दीपक सागरे, समविचारी संस्था उपस्थित होते. 

****

25 March, 2023

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

अन्न प्रक्रिया उद्योजकासाठी सुवर्णसंधी

 

केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 35 टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार असल्याने ही योजना वरदान ठरणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसहाय्यता गटांना प्रक्रिया उद्योग सुरु करता येतो. या माध्यमातून शेतमालाला चांगला भाव आणि शासकीय अनुदानही  मिळणार आहे.

केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना देशभरामध्ये राबविण्यात येत आहे. सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षासाठी ही योजना राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे, अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे, सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे तसेच सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे हे योजनेचे मुख्य उद्देश आहेत.

ही योजना एक जिल्हा एक उत्पादन (ओडीपी) या धर्तीवर राबविली जाणार आहे. जिल्ह्यासाठी हळद पिकासाठी मूल्य साखळी व सामुहिक सुविधा निर्मितीकरिता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून इच्छूक शेतकऱ्यांना प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकांकडून प्रस्ताव मंजूर करण्यास मदत करणे, उद्योगासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या काढून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.

लाभ मिळण्यासाठी पात्रता : 

या योजनेअंतर्गत 18 वर्षावरील वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, नवउद्योजक, महिला, प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, गैर सरकारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी कंपनी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ देय आहे.

सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्था भाग घेऊ शकतात. या घटकासाठी पात्र प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 03 कोटी कमाल मर्यादेपर्यंत क्रेडीट लिंक कॅपिटल सबसिडी देय आहे.

इन्क्युबेशन सेंटर साठी शासकीय संस्था- 100 टक्के, खाजगी संस्था- 50 टक्के तर आदिवासी क्षेत्रातील खाजगी संस्था, उत्तर पूर्व राज्ये व मागास जाती जमाती प्रवर्गासाठी 60 टक्के अनुदान देय आहे. तर ब्रँडिंग व पॅकेजिंगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम अनुदान देय असून यासाठीची कमाल निधी मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल.

बचत गटातील सदस्यांना बीज भांडवल अंतर्गत खेळते भांडवल किंवा गुंतवणुकीसाठी रक्कम 40 हजार रुपये प्रती सदस्य (प्रती बचत गटास रु. 4 लाख) देय आहे.

आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात 419 प्रस्ताव :

केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्ग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 419 जणांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत 09 लाभार्थ्यास कर्ज मंजूर झाले असून 96 प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

                                                                                                       --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                             माहिती सहायक

                                                                                                             जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

*****