29 August, 2025

सोयाबीनवर पिवळा मोझॅक; * वेळीच व्यवस्थापन करण्याचा तज्ञांचा सल्ला

हिंगोली(जिमाका), दि. 29 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जिल्हा मासिक चर्चासत्रांतर्गत प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्यात सेनगाव तालुक्यात विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांच्या चमूने पुसेगाव, रिधोरा व सेनगाव शिवारातील सोयाबीन कापूस, तूर, हळद, केळी अशा विविध प्रक्षेत्रावर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञांच्या व अधिकाऱ्यांच्या चमूने पुसेगाव येथील सोयाबीन प्रक्षेत्रावर भेट दिली असता त्या ठिकाणी पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त सोयाबीनची झाडे दिसून आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबंधित प्रादुर्भावग्रस्त झाडे निदर्शनास आणून हा रोग विषाणूजन्य आहे आणि तो पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत पसरतो. या रोगाला वेळीच ओळखून उपाययोजना नाही केल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात पसरून पूर्ण शेत प्रादुर्भावग्रस्त करतो व त्यामुळे झाडांना फुले, शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळेत नियोजन करणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. व्यवस्थापनासाठी पिवळा मोझॅक(केवडा) झालेली पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून टाकावीत. जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्लोनिकॅमीड 50 टक्के डब्ल्यूजी 80 ग्रॅम (4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6 टक्के झेडसी 50 मिली (2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा असिटामिप्रीड 25 टक्के + बाइफेन्थ्रीन 25 टक्के डब्ल्यूजी 100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49 टक्के + इमिडाक्लोप्रीड 19.81 टक्के ओडी 140 मिली (7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रती एकर या प्रमाणात करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रती एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत. तसेच फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी, असे आवाहन तज्ञांमार्फत करण्यात आले. या चमूमध्ये विद्यापीठातर्फे विस्तार कृषि विद्यावेता डॉ. गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत हे तर कृषी विभागातर्फे उपसंचालक (कृषी) प्रसाद हजारे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे आणि शिवप्रसाद संगेकर हे सहभागी झाले होते. ***

मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून शासकीय वसतीगृह प्रवेश व शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वसतीगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत शैक्षणिक सहाय्य दिले जाणार आहे. ही योजना विशेषत: इयत्ता 12 वी उत्तीर्ण करुन बिगर व्यवसायिक अथवा व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर दि. 18 सप्टेंबर, 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, हिंगोली येथे भेट द्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा

हिंगोली (जिमाका), दि. 29 : येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी यांची बैठक डापकू कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाविषयी माहिती देऊन सर्व एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच विभागांनी मदत करून त्यांना सामाजिक लाभाच्या योजना, येणाऱ्या अडचणी व उपाययोजना व संबंधित योजना मिळवून देण्याची विनंती सर्वांना केली. तसेच एड्सचा 2017 चा कायद्याबद्दल माहिती दिली. यावेळी वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुनील भुक्तार, समाज कल्याण कार्यालयाचे एच. बी. पोपळघट, महिला व बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, रामप्रसाद मुडे, श्रीमती अलका रणवीर, इरफान कुरैशी तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, श्रीमती टीना कुंदणानी व आशिष पाटील यांनी सहकार्य केले. ****

ग्रामीण मागासवर्गीय मुलामुलींना अर्थसहाय्यासाठी लाभार्थ्यांची प्रारुप यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीस्तरावरुन लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र-अपात्र झालेल्या अर्जाची प्रारुप यादी पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. पात्र-अपात्र यादीबाबत काही सूचना व हरकती असल्यास लाभार्थींने 7 दिवसाच्या आत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अथवा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. विलंबाने आलेल्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. ***

मागासवर्गीय विद्यार्थी लॅपटॉप लाभार्थ्यांची प्रारुप यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा परिषद हिंगोली यांच्यामार्फत सेस योजना सन 2025-26 अंतर्गत 20 टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीस्तरावरुन लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जाची छाननी करुन प्रारुप यादी पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. पात्र-अपात्र यादीबाबत काही सूचना व हरकती असल्यास संबंधित लाभार्थीने 7 दिवसाच्या आत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अथवा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. विलंबाने आलेल्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. ***

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेऊन यशस्वी करावा - निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड

• ‘श्रीगणेशा आरोग्याचा’उपक्रमातून जिल्ह्यात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी • मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार हिंगोली (जिमाका), दि.29 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. हे अभियान जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेऊन यशस्वी करावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी आयोजित बैठकीत दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, डॉ. बालाजी भाकरे, डॉ.मोहसीन खान, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, गणेश मंडळाचे प्रतिनिधी कल्याणराव देशमुख, सचिन इंगळे, नागेश संगेकर, संतोष शेंडगे आदी उपस्थित होते. सार्वजनिक गणेश मंडळाचे सहकार्य घेऊन जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2025 या कालावधीत जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. या शिबिरामध्ये विविध तपासणीसह मुख्यमंत्री सहायता निधी व शासन आरोग्यविषयी राबवित असलेल्या विविध योजनेची जनजागृती करावी, अशा सूचना यावेळी श्री. बोधवड यांनी दिल्या. यावेळी माहिती देताना डॉ. कोरडे म्हणाले, मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच धर्मादाय रुग्णालयांशी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात जवळपास 200 आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत. या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे. तसेच या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत असून, या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी केले आहे. ******

दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्तीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि.29 : परभणी डाक विभागातर्फे दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आता 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये परभणी डाक विभागामध्ये 11 विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पटकावलेली आहे. यावर्षीही दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना 2025-26 स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व शाळांनी सहभाग नोंदवून आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाची शिष्यवृत्ती पटकावण्याची संधी द्यावी, असे आवाहन डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक डाक अधीक्षक (मुख्यालय) पवन मोरे, कार्यालयीन सहायक श्रीपाद कुंभारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परभणी डाक विभागामार्फत करण्यात आले आहे. *****