हिंगोली, दि. २६ ऑक्टोबर (जिमाका) : बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ (पोक्सो कायदा) याविषयी जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय शालेय जनजागृती मोहिमेअंतर्गत तालुका विधी सेवा समिती, हिंगोलीतर्फे सरजुदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुसऱ्या सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिंगोली येथील न्यायाधीश श्रीमती एस. एस. पळसुले होत्या. जिल्हा वकील संघाच्या अॅड. श्रीमती आर. एन. शर्मा यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. आर. घुगे आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गुंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. श्रीमती आर. एन. शर्मा यांनी बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ मधील तरतुदी, लैंगिक अत्याचाराविरोधात तक्रार करण्याची प्रक्रिया, तक्रार नोंदविण्याची केंद्रे आणि उपलब्ध समुपदेशन सुविधांविषयी माहिती दिली. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक ओळखणे, अनुचित प्रसंग घडल्यास विश्वासू व्यक्तीला सांगणे आणि मदत मागणे याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अन्यायाविरोधात न घाबरता आवाज उठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गुंडेकर यांनी विद्यार्थिनींना या कायद्याविषयी देण्यात आलेली माहिती आत्मसात करून तिचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात न्यायाधीश श्रीमती एस. एस. पळसुले यांनी बालपणातील सुरक्षित वातावरणाचे महत्त्व विशद केले. बालकांना आनंदाने आणि निर्भयपणे जगण्याचा अधिकार असून, त्यांच्या संरक्षणासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कायद्यातील तरतुदींची माहिती देत राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध सेवा व सुविधा बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका विधी सेवा समिती तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी विद्यार्थिनींना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. एम. ए. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर विद्यालयाचे सहशिक्षक एम. एस. देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. अभियानाच्या आयोजनासाठी तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी. बी. हनवते आणि कनिष्ठ लिपिक एन. एस. दिंडे यांनी विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने कामकाज पार पाडले.
No comments:
Post a Comment