निवडणूक साहित्यासह मतदान पथके रवाना
शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान
मतदारांना मतदान करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. २२ (जिमाका) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली येथील उपविभागीय कार्यालयातील तसेच जलसंपदा विभागातील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मूलभूत सुविधा, प्रवेश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. तसेच सेनगाव तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदान पथके रवाना करण्याच्या प्रक्रियेचीही पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे उपस्थित होते.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, सर्व तहसील कार्यालयांतून निवडणूक साहित्यांसह मतदान पथके संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात एकूण १० हजार ३१५ मतदार असून, त्यामध्ये ८ हजार ३३७ पुरुष आणि १ हजार ९७८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवरील आवश्यक सुविधा, दिशादर्शक सूचना, मतदान साहित्याची उपलब्धता आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची सज्जता यांची खातरजमा करण्यात आली आहे.
मतदानानंतर मतपेट्या सुरक्षितपणे जमा करण्याची व्यवस्था
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या विभागीय आयुक्त तथा ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील निर्धारित सुरक्षित कक्षात (स्ट्राँग रूम) पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी वरिष्ठ उपजिल्हाधिकारी व त्यांचे पथक तसेच पोलीस विभागाचे सशस्त्र सुरक्षा पथक तैनात राहणार आहे. मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक आणि जमा करण्याची प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे. मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment