
▶️ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश; चारा उपलब्धता वाढविण्यावरही भर
हिंगोली, दि. २१ (जिमाका) : वसमत तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने उपाययोजना कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० जलतारा प्रकल्प साठ्यांची निर्मिती करावी, तसेच ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
वसमत येथील पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत तालुक्यातील पाणी उपलब्धता, चारा नियोजन आणि संभाव्य टंचाईच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यावे. पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी कुरण लागवडीला प्रोत्साहन द्यावे. जिल्ह्याबाहेर चारा वाहून नेण्यावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी तलाठ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
गावपातळीवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दर शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. टंचाईसंदर्भातील समस्यांचे तातडीने निराकरण करून कार्यवाहीचा अहवाल नियमित सादर करावा. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटावाड, सहायक गटविकास अधिकारी जी. बी. बोथीकर, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. इंगोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment