पंचायत समिती औंढा नागनाथ येथील सभागृहामध्ये बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न
गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंता घोरपडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांची उपस्थिती
हिंगोली दि. 22 ऑक्टो :- ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि समग्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देत गावे निरोगी व सशक्त करण्याच्या उद्देशाने 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून पंचायत समिती औंढा नागनाथ येथील सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यशाळा आणि आढावा बैठक आयोजित केली होती.
कार्यशाळेच्या मुख्य सत्रात बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके म्हणाले की, "'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हा उपक्रम केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून, लोकसहभागातून उभी राहणारी एक व्यापक आरोग्य चळवळ आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्मिती, स्वच्छता, योग्य पोषण, माता-बाल आरोग्य आणि असंसर्गजन्य आजारांची वेळेत तपासणी करून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी गावातील सर्व घटकांनी आणि आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे."
याप्रसंगी गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांनी ग्रामपंचायतींच्या भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले, "गावाच्या समृद्धीचा पाया हा तिथल्या नागरिकांच्या सुदृढ आरोग्यावर अवलंबून असतो. अभियानांतर्गत निर्धारित केलेल्या निकषांनुसार औंढा तालुक्यातील गावांमध्ये १०० टक्के लसीकरण, शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि टीबी मुक्त गाव यांसारख्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा आरोग्य विभागाला पूर्ण पाठिंबा राहील. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनातर्फे पुरस्कृत देखील केले जाईल."
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अनंता घोरपडे यांनीही मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत स्तरावरील विविध समित्या आणि आरोग्य यंत्रणेमध्ये ताळमेळ असणे किती गरजेचे आहे, यावर प्रकाश टाकला. लोकसहभाग वाढवून गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी पंचायत समितीचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि तालुक्याच्या अभियानाची सविस्तर माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी स्पष्ट केले की, "औंढा नागनाथ तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून घराघरांपर्यंत आरोग्य तपासणी व योजना प्रभावीपणे पोहोचवल्या जातील."
या कार्यशाळेला औंढा नागनाथ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि गट प्रवर्तक, आशा वर्कर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment