हिंगोली, दि. २२ ऑक्टोबर २०२६ (जिमाका) : निपुण हिंगोली अभियान २.० अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे तसेच अध्ययनातील अडचणी दूर करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीचे नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासोबतच राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज, सातारा सैनिक स्कूल अशा ठिकाणी निवड होईल यादृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करुन घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, प्राथमिक शिक्षणाधिकारी मंजूश्री कल्लेवाड, डायटचे अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
बैठकीत स्पर्धा परीक्षा प्रश्नपेढी निर्मिती, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील कमी संपादणुकीच्या प्रश्नांवर आधारित उपचारात्मक अध्यापन साहित्य तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, स्पर्धा परीक्षा अध्ययन साहित्य विकसित करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग आणि प्रत्यक्ष समस्या निराकरण सत्र आयोजित करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
याशिवाय, गुणवंत विद्यार्थ्यांची ‘सुपर ३०’ उपक्रमासाठी निवड प्रक्रिया, संकलित चाचणी क्रमांक १ चे नियोजन आणि निपुण हिंगोली २.० अंतर्गत भाषा व गणित विषयातील अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ‘भाषा-गणित मित्र’ उपक्रमाचा कृती कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली.
अभियानाच्या पुढील टप्प्यात निवडक चार हजार विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्यांचे नियोजन करणे, स्पर्धा परीक्षांसाठी विषयवार तज्ज्ञ मार्गदर्शकांचे गट तयार करणे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देणे या बाबींवर भर देण्यात आला. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर संबंधित जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करून अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक दिशा व निर्देश दिले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, अध्ययनातील अडचणी दूर करणे आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम विद्यार्थी घडविणे, हा निपुण हिंगोली अभियान २.० चा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी राजीव गांधी अपघात विमा योजना, नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गंत 25 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा याबाबतच चर्चा करुन आढावा घेण्यात आला.
No comments:
Post a Comment