22 October, 2026

आखाडा बाळापूर आरोग्य केंद्रात 'सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा' (सीपीएचसी) प्रशिक्षण

प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यावर भर
​हिंगोली, ( दि. २२ )
 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि  नोडल अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कळमनुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र  आखाडा बाळापूर येथे आज घेण्यात आले.
​या प्रसंगी जनरल फिजिशियन डॉ. नारायण भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. प्रकाश जाधव,  डॉ. राजेश्वर कत्रूवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुरज बोडखे, जिल्हा प्रशिक्षण संघाच्या शाखा सदस्य शोभा पवार, ज्योती बांगर, नंदा चव्हाण  हे प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.

​ प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश
​ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्य व कार्यक्षमता उंचावणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे.
प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे.
 आयुष्मान आरोग्य मंदिर-उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका आरोग्य सेवक, आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली जाते.
​आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्यास ग्रामीण आरोग्य सेवेत अमुलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. गाव पातळीवरच जास्तीत जास्त आजारांवर उपचार करणे आणि अनावश्यक रेफरल्स टाळणे म्हणजेच "Resolve more, Refer less" हे सूत्र प्रभावीपणे अंमलात आणण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात आले. गावात माता मृत्यू व बाल मृत्यू दर शून्य ठेवणे, टी.बी., उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांचे वेळेत स्क्रिनिंग करणे आणि समुदायाशी जवळीक साधून गृहभेटी व आरोग्य शिबिरे आयोजित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
​सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेचे १३ प्रमुख घटक:
​या प्रशिक्षण सत्रात १३ मूलभूत घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले:
​गरोदरपण, प्रसूती व प्रसूती पश्चात काळजी: गरोदर महिलांची वेळेवर नोंदणी, नियमित तपासण्या, सुरक्षित संस्थात्मक प्रसूती आणि प्रसूतीनंतर माता व नवजात बालकांची योग्य काळजी.
​नवजात व अर्भक आरोग्य सेवा: जन्मानंतरची तत्काळ काळजी, त्वरित स्तनपान, लसीकरण आणि कुपोषण व संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण.
​बालक व किशोरवयीन आरोग्य: बालकांची वाढ व विकासाचे निरीक्षण, पोषण सुधारणा आणि किशोरवयीन आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन.
​कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य: सुरक्षित मातृत्वासाठी कुटुंब नियोजनाच्या साधनांची उपलब्धता, समुपदेशन आणि उपचार.
​संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन: क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, एचआयव्ही यांसारख्या आजारांचे ऍक्टिव्ह स्क्रीनिंग, त्वरित उपचार व सर्वेक्षण.
​सामान्य व किरकोळ आजारांवर उपचार: ताप, सर्दी, खोकला, अतिसार यांसारख्या आजारांवर स्थानिक पातळीवरच मानक प्रोटोकॉलनुसार उपचार.
​असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण : मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि कर्करोगाचे नियमित स्क्रिनिंग व जीवनशैलीत सकारात्मक बदल.
​डोळे व कान यांचे प्राथमिक आरोग्य: दृष्टीदोष, मोतीबिंदू व श्रवणदोषांचे प्राथमिक टप्प्यात निदान व आवश्यक उपचार.
​मौखिक आरोग्य: दातांची स्वच्छता, मुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती.
​वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर: ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांचे नियमित व्यवस्थापन आणि असाध्य आजार असलेल्या रुग्णांना वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी मानसिक व वैद्यकीय आधार.
​आपत्कालीन वैद्यकीय सेवा: अपघात, हृदयविकार व श्वसनाच्या समस्यांवर तत्काळ प्राथमिक उपचार आणि रुग्णवाहिका यंत्रणेचे सक्षमीकरण.
​मानसिक आरोग्य सेवा: नैराश्य, ताणतणाव व व्यसनाधीनता यावर प्राथमिक पातळीवर ओळख, समुपदेशन व योग्य मार्गदर्शन.
​योग व आयुष पद्धती: निरोगी जीवनशैलीसाठी योग, आयुर्वेद व होमिओपॅथीचा पूरक उपचार म्हणून वापर व प्रसार.
​संवाद कौशल्य, सकारात्मक देहबोली आणि प्रभावी नेतृत्व गुणांचा वापर करून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व रुग्णस्नेही बनवण्याचा संकल्प या प्रशिक्षणाद्वारे करण्यात आला.
या प्रशिक्षणाला समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा वर्कर उपस्थित होते

No comments: