हिंगोली (दि. २६ ऑक्टोबर):
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास योजना आणि विभागांच्या प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्याला प्राधान्य
१० ते १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमधील ॲनिमिया चे प्रमाण लवकरात लवकर ओळखून त्यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.
जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) सहकार्याने विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी.
यादरम्यान मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याची काळजी याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात यावे. ॲनिमिया निर्मूलनासाठीच्या कॅम्पबाबतचा सूक्ष्म कृती आराखडा लवकरात लवकर तयार करून सादर करावा, असे आदेश देण्यात आले. समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच 'पियर एज्युकेटेड ग्रुप'च्या मुलाकरिता विशेष आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या.
केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांचा आढावा घेताना, आयुष्यमान भारत कार्ड आणि वय वंदना कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत गती आणण्याचे निर्देश देण्यात आले. जास्तीत जास्त पात्र नागरिकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी यंत्रणेने सक्रिय राहावे, असे स्पष्ट करण्यात आले.
पाणीटंचाई, जलतारा आणि चारा नियोजनाचे कडक निर्देश
आगामी उन्हाळा आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.
पाणीटंचाई आराखडा: पाणीटंचाईचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी जून २०२७ पर्यंतचा पाणीटंचाईचा सर्वसमावेशक आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जलतारा व चारा लागवड: 'जलतारा' अंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. जनावरांना चारा कमी पडू नये म्हणून चारा लागवडीचे काटेकोर नियोजन करून त्याचा कृती आराखडा सादर करावा. तसेच, जिल्ह्यातील सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येच्या प्रमाणात कुरण लागवड क्षेत्र वाढवण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून जनावरांच्या चारा प्रश्नी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने, ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या सभा आणि ठरावांचे जिओ-टॅग केलेले फोटो ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश पंचायत समितीला देण्यात आले.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी भगत, मंजुश्री कलेवाड, संदीप सोनटक्के, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रविंद्र पुरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment