• २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम
• मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
हिंगोली, दि. २६: बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासह जंतसंसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील २ लाख ८८ हजार २८१ बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागांनी समन्वयाने ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद हिंगोली येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विपुल भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मंजुश्री कल्लेवाड, शिक्षणाधिकारी (योजना) संदीप सोनटक्के जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रविंद्र पुरी, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
*शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांमधून गोळ्यांचे वाटप*
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी मोहिमेची माहिती देताना सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वयोगटानुसार निश्चित केलेल्या मात्रेत अल्बेंडाझोल जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत, तर अंगणवाडीतील बालकांना आणि शाळाबाह्य मुला-मुलींना अंगणवाडी सेविकांमार्फत गोळ्या देण्यात येतील.
२७ ऑक्टोबर रोजी गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष पूरक मोहिमेच्या दिवशी (मॉप-अप दिन) जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
*स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्यावर भर*
आतड्यांतील जंतसंसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय आणि कुपोषणाचा धोका वाढू शकतो. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर, शैक्षणिक कामगिरीवर आणि सर्वांगीण विकासावर होतो. त्यामुळे जंतनाशक मोहिमेसोबतच स्वच्छतेच्या सवयींबाबत जनजागृती करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले.
शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि मोहिमेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय पथकांनी भेटी देऊन पर्यवेक्षण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जंतसंसर्ग टाळण्यासाठी नियमित हात धुणे, स्वच्छतागृहाचा वापर करणे, स्वच्छ पाणी पिणे तसेच शूज किंवा चप्पल वापरणे या स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जंतनाशक गोळी घेतल्यानंतर काही त्रास जाणवल्यास किंवा शंका उद्भवल्यास संबंधित आरोग्य कर्मचारी अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आरोग्यविषयक सल्ल्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४, तर तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी १०८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
बैठकीच्या शेवटी जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी आभार मानले.
*******
No comments:
Post a Comment