26 October, 2026

रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिटसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन हिंगोली जिल्ह्यासाठी ३ हजार ३७० मिनीकिट्सचे उद्दिष्ट; १० नोव्हेंबरपूर्वी होणार वितरण

         हिंगोली, (जिमाका) 26 ऑक्टोबर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) उपअभियान सन २०२६-२७ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी ३ हजार ३७० बियाणे मिनीकिट्सचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. या माध्यमातून एकूण १३४.८० क्विंटल बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

        सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थिती, कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि शेती उत्पादनावर होणारे संभाव्य प्रतिकूल परिणाम लक्षात घेता रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. रब्बी ज्वारी हे कमी पाण्यात येणारे महत्त्वाचे अन्नधान्य व चारा पीक आहे. या पिकाच्या सुधारित वाणांचा प्रसार करणे, उत्पादकता वाढविणे तसेच कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळवून देणाऱ्या व दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या वाणांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेचे स्वरूप व लाभार्थी निवड

        या योजनेअंतर्गत प्रत्येक मिनीकिटमध्ये ४ किलो प्रक्रिया केलेले सुधारित ज्वारी बियाणे, जैविक खताची पाकिटे आणि पीक लागवड तंत्रज्ञानविषयक माहितीपत्रकाचा समावेश आहे. दहा वर्षांच्या आतील सुधारित वाणांचा प्रसार करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने बियाणे मिनीकिट्सचे वितरण करण्यात येणार आहे.

        कमी पाण्यात येणारे रब्बी ज्वारी पीक दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेमुळे सुधारित वाणांचा वापर वाढण्यास, पीक उत्पादकता वाढविण्यास आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर तातडीने ऑनलाइन अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि वेळेत पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

No comments: