हिंगोली, दि. २७ ऑक्टो:- राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, हट्टा अंतर्गत कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांना व बालकांना जंतनाशक औषध देण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकूण ३० शासकीय शाळा, ८ खासगी शाळा आणि ४७ अंगणवाड्यांमधील बालकांना जंतनाशक औषध देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या मोहिमेसाठी एकूण ११ हजार ४०३ मुले व मुली लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १० हजार ४०८ लाभार्थ्यांना जंतनाशक औषध देण्यात आले. या उपक्रमाद्वारे बालकांचे आरोग्य सुधारण्यास, त्यांच्यातील कृमी संसर्गाचे प्रमाण कमी करण्यास आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यास मदत होणार आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि तालुका आरोग्य अधिकारी वसमत डॉ. संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, हट्टा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. सिद्दिकी व डॉ. बद्रीनाथ कदम, तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शाळा व अंगणवाडी स्तरावर समन्वय साधून ही मोहीम यशस्वी राबविण्यात आली.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या माध्यमातून बालकांना कृमी संसर्गापासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
No comments:
Post a Comment