27 October, 2026

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन

 विशेष लेख                                                                                                                  दि. 26 ऑक्टोंबर 2026

                  
व्याख्यानमाला, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथप्रदर्शने, 

प्रशिक्षण कार्यशाळा आणि पर्यावरणविषयक जनजागृतीवर भर

        महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध विभागांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. व्याख्यानमाला, ग्रंथवाचन, चित्रपट व माहितीपटांचे प्रसारण, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यशाळा आणि पर्यावरणविषयक जनजागृती अशा विविध माध्यमांतून महात्मा जोतीराव फुले यांचे विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.

शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम

        शाळा, महाविद्यालये, शासकीय व सार्वजनिक ग्रंथालये तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन, रांगोळी स्पर्धा, प्रभातफेरी आणि पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथालयांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याची प्रदर्शने, सामूहिक वाचन आणि त्यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

    महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर माहितीपट व लघुचित्रफिती तयार करून समाजमाध्यमांसह विविध माध्यमांतून प्रसारित करण्याचेही नियोजन आहे. त्यांच्या साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद व प्रकाशन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.

महिला सक्षमीकरण व सामाजिक समतेसाठी उपक्रम

        महात्मा जोतीराव फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, तसेच महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध, वक्तृत्व आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे, त्यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेणे आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.

कौशल्य विकास व उद्योजकतेला प्रोत्साहन

    व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून ‘महात्मा फुले तांत्रिक प्रदर्शनी’ आणि ‘सत्यशोधक’ या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तांत्रिक प्रकल्प स्पर्धा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरीय कार्यक्रम तसेच ग्रामीण व दुर्गम भागांतील बेरोजगार युवक आणि महिलांसाठी उद्योजकता कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कृषी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती

        पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने शाश्वत शेती व जलसंवर्धन विषयक परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. बदलते हवामान, सेंद्रिय शेती, पीकपद्धतीतील बदल, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, बांबू लागवड आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रयोगांवर या परिषदांमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

        पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठांच्या सहकार्याने ग्रामीण भागात पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे, वृक्षलागवड आणि सौरऊर्जेचा वापर यांसारख्या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणविषयक घोषवाक्य, समाजमाध्यमांवरील लघुचित्रफिती आणि बॅनर स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष अभियान

        महसूल विभागामार्फत ‘महात्मा जोतीराव फुले महसूल अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावरील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध महसुली दाव्यांचा व अपिलांचा निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच विविध स्तरांवर लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्यावर भर

        महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे केवळ त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यापुरते मर्यादित नसून, त्यांनी मांडलेल्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि शेतकरी कल्याणाच्या विचारांना कृतीत उतरविण्याची संधी आहेत. शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, ग्रंथप्रदर्शने, स्पर्धा, कौशल्य विकास कार्यशाळा, उद्योजकता प्रोत्साहन, शाश्वत शेती व पर्यावरण संवर्धनविषयक जनजागृती तसेच महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राबविण्यात येणारे विशेष अभियान अशा विविध उपक्रमांतून त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा विकसित करणे, युवक व महिलांना कौशल्य आणि उद्योजकतेच्या संधींशी जोडणे, शेतकरी व नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभतेने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा समाजजीवनाशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित होण्यास मदत होईल. त्यांच्या सत्यशोधक, विवेकनिष्ठ आणि परिवर्तनवादी विचारांमधून प्रेरणा घेत समताधिष्ठित, शिक्षित आणि प्रगत समाजनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करणे, हेच द्विजन्मशताब्दी वर्षाच्या उपक्रमांचे व्यापक उद्दिष्ट आहे.


अलका पाटील,

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय, 

हिंगोली

No comments: