14 October, 2022

 

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील शारीरिक शिक्षकांनी

22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : कोव्हीड -19 प्रादुर्भावामुळे सन 2022-21 व 2021-22 या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुकास्तर ते राष्ट्रीयस्तर आयोजन होऊ शकले नाही. सन 2022-23 या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत स्पर्धांचे आयोजन करण्यास क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मान्यता प्रदान केली आहे. तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षातील राज्यस्तर स्पर्धाचे स्थळ निश्चित करण्यात आलेले आहे.

हिंगोली जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत या वर्षी ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शारीरिक शिक्षक यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशाला जवळ असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये (डायट कॉलेज) दि. 22 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 10.00  वाजता ऑनलाईन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यालय, महाविद्यायातील शारीरिक शिक्षकांना कार्यमुक्त करावे, तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शारीरिक शिक्षकांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******

No comments: