04 October, 2022

 महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा व रोजगार मेळाव्यामध्ये

सहभाग नोंदवण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018 जाहीर केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविण्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्टार्टअपची स्वप्ने साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्टार्टअप यात्रेच्या डिस्प्ले व्हॅनद्वारे हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 20 ऑगस्ट ते दि. 2 सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यामध्ये प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. त्याचबरोबर दि. 14 ऑक्टोबर, 2022  रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सहभागी स्टार्टअपचे सादरीकरण सत्र (Boot Camp and Pitching Session) प्रधान मंत्री कौशल्य केंद्र, अकोला रोड, बळसोंड, हिंगोली येथे होणार आहे. या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनीबीलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छत ऊर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता व इतर विविध क्षेत्रातील नाविण्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईल. पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणास अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने या सादरीकरण सत्रासोबत रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपनीमध्ये जवळपास 800 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

उपरोक्त नाविन्यतापूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण करण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांनी आपल्या नाविन्यतापूर्ण कल्पना व उद्योगांबाबतच्या सादरीकरण सत्रामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या यात्रेमध्ये व रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त नवोदित उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

***** 

No comments: