04 October, 2022

 

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरावी

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा प्रशासन पूर्णपणे रेशीम शेतकऱ्यासोबत असून शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक उद्योग म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक एकर तरी रेशीम शेती करुन शेतकऱ्यांनी स्वत:चा, कुटुंबाचा, आपल्या संपूर्ण गावाचा उत्कर्ष साधत रेशीम शेतीची कास धरावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्त उत्कृष्ट कोष उत्पादन, सातत्यपूर्ण उत्कृष्ट रेशीम शेती, उद्योन्मुख रेशीम शेतकरी, रोपवाटिका निर्माण करणारे , बाल किटक संगोपन करणारे अशा रेशीम शेतीच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 17 शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते.

            पदोन्नती होऊन नागपूर जिल्ह्यात कार्यरत झालेले हिंगोली जिल्ह्याचे मावळते जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे व नवनियुक्त जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांचा जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी नवनियुक्त जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली हे पूर्वीप्रमाणेच भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम असेल असा निर्धार व्यक्त केला. उपजिल्हाधिकारी (रोहयो) कमलाकर फड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचा उत्साह वाढवला. मावळते जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी गेली 4 वर्ष शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबदद्ल, दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व रेशीम शेतकरी बांधवाप्रती ऋण व्यक्त केले.

याप्रसंगी संपूर्ण जिल्हाभरातून 150 शेतकऱ्यांची उपस्थिती असून रेशीम शेतीमुळे जीवनमान उंचावल्या गेलेल्या शेतकऱ्यांपैकी श्रीधर श्रृंगारे, धनाजी सारंग, दिपक शिंदे, माधव अंबेकर, सुरेश कुटे, सुरेश भोसले, संतोष चोंढीकर यांनी त्यांचे अनुभव कथन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, यशस्वी आयोजन तसेच सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे यांनी केले. आभार प्रदर्शन कपिल सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. एस. जांबुतकर, आर. आर. रणवर, आर. के. कुटे. एस. बी. इंगाले, रमेश भवर, गणेश पडघान, संतोष चव्हाण, तान्हाजी परघणे यांनी परिश्रम घेतले.

*****

No comments: