01 October, 2022

 

जेष्ठ नागरिक दिन विविध कार्यक्रमाने साजरा

आरोग्य शिबिरात 47 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

  • सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी ज्येष्ठ नागरिकासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

 




हिंगोली (जिमाका), दि. 01 : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून त्याचाच एक भाग म्हणून आज "आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिना"निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे जेष्ठ नागरिकासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.  

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण मित्र संघाचे  राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार, आखाडा बाळापूर येथील छत्रपती जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष बी. टी. कन्नावार, जिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे अध्यक्ष एम.एल.पोपळाईत, छत्रपती जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य आर.एन.व्यवहारे, जॉएन्ट्स ग्रुपचे रत्नाकर महाजन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारर्थी तथा जेष्ठ नागरिक विक्रम जावळे,  सहाय्यक आुयक्त शिवानंद मिनगीरे, डॉ. लखमावार, सुरेशचंद्र सोमाणी, हर्षवर्धन परसवाळे, अधीक्षक सत्यजीत नटवे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.विजय निलावार यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना उद्देशून " वृध्दत्व म्हणजे हरवलेले तारुण्य नाही, तर संधी आणि नवचैतन्याची शैली आहे, असा सुखी जीवनाचा मुलमंत्र दिला. तसेच विक्रम जावळे यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना उद्देशून जेष्ठ नागरिकाबाबत माझे खरे प्रेम आणि खरी श्रद्धा असल्याचे मनोगत व्यक्त केले. रत्नाकर महाजन यांनी आपल्या घरच्या वडिलधाऱ्यांची आणि ज्येष्ठांची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे हे कर्तव्य आहे, असे सांगितले. तर अध्यक्षीय समारोपामध्ये पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिकांसाठी 112 पोलीस विभागाची हेल्पलाईन सुरु केली असल्याचे सांगून शासन आपल्या सोबत असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी वृध्दाश्रम योजना, मातोश्री वृध्दाश्रम योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, 60 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना ओळखपत्र, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आई-वडील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम-2007, जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रं. 14567 अशा विविध योजना सुरु असल्याची माहिती दिली.

यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन त्यांच्या अडी-अडचणी बाबत खुली चर्चा केली. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकामार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 47 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम फुले, शाहु, आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सर्व जेष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु.श्रध्दा तडकसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे सर्व कर्मचारी वृंद व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आरोग्य पथकातील कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

*******

No comments: