18 October, 2022

कयाधू व आसना नदी जलसंवाद यात्रेला हिंगोली येथे शुभारंभ कयाधू व आसना नदी संवाद यात्रा हा क्रांती करणारा अभिनव उपक्रम - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


 





कयाधू व आसना नदी जलसंवाद यात्रेला हिंगोली येथे शुभारंभ

कयाधू व आसना नदी संवाद यात्रा हा क्रांती करणारा अभिनव उपक्रम

                                                                - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : "चला जाणू या नदीला" या मोहिमेंतर्गत कयाधू व आसना नदी जलसंवाद यात्रा हा अभिनव कार्यक्रम सर्व स्वयंसेवी संस्था व जनता या सर्वांनी मिळून एकत्रित सहभाग घेऊन राबविण्यात येणार असून हा उपक्रम क्रांती करणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी  केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा अंमलबजावणी समिती, उगम ग्रामीण विकास संस्था आणि सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कयाधू व आसना नदी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ जलकलश पूजनाने करण्यात आला. याप्रसंगी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने , चला जाणूया नदीला या अभियानाच्या राज्य समितीचे सदस्य जयाजी पाईकराव, डॉ.संजय नाकाडे, डॉ. किशन लखमावार, वन विभागाचे अधिकारी बी.एच. कोळगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, "चला जाणू या नदीला " अभियानांतर्गत कयाधू व आसना नदी जनसंवाद यात्रा हा उपक्रम सर्वसामान्य जनसमुदायापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ही एक अनोखी यात्रा असून नदीचे प्रदूषण हा एक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न असून त्या प्रश्नाने आता गंभीर स्वरुप धारण केले असल्याचे सांगून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कयाधू व आसना नदीचे काम करण्याची गरज आहे. या नदी अभियानात सर्व घटकांने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचून नदीचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. नदीचे पुनजीवन करण्यासाठी त्यांचे प्रदूषण कसे कमी करता येईल, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कयाधू योध्दे तयार करुन त्यांच्या माध्यमातून नदीचे काम करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ती मदत करण्यात येईल. यासाठी निधीची गरज भासल्यास लोकप्रतिनिधीची मदत घेऊन राज्यपातळीवरुन मदत मिळवून देण्यात येईल. ही जनसंवाद यात्रा दि. 15 ते 25 नाव्हेंबर या कालावधीत घेण्याचे नियोजन आहे. उगम संस्थेचे जयाजी पाईकराव यांचे कार्य चांगले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी मानवी संस्कृतीचा उगम नदीच्या शेजारीच झाला आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. या नदी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नदीचे महत्व लोकांना पटवून देणे, त्यासाठी लोकांचा सहभाग घेऊन नदी जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करावा, जिल्हा प्रशासन आपल्या सदैव सोबत आहे, असे सांगितले.

            यावेळी स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी बाबूराव खराटे, डॉ.संजय नाकाडे, शोभाताई मुगले यांनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व पुनरुज्जीवन करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याची माहिती दिली.

            प्रास्ताविकात उगम संस्थेचे अध्यक्ष तथा चला जाणू या नदीला या अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे सदस्य जयाजी पाईकराव यांनी चला जाणूया नदीला या अभियानाची माहिती देताना म्हणाले, उगम संस्थेतर्फे 2018 मध्ये जलदिंडी यात्रा करुन नदी पुनर्जीवनाचे काम केले आहे. आता या मोहिमेला व्यापक स्वरुप देणे गरजेचे असल्याने राज्यातील 75 नद्यांचे पुनजीवित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात कयाधू व आसना नदी जनसंवाद यात्रा हा कार्यक्रम दिवाळीनंतर राबविण्यात येणार आहे. नद्या प्रदूषण मुक्त आणि जलयुक्त करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांचा सहभाग घेऊन आणि यात सातत्य राखून काम करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

            कार्यक्रमाच्या शेवटी जल प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार हरिभाऊ पट्टेबहादूर यांनी मानले.

या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

 

 

No comments: