17 November, 2022

 

पूर्णा प्रकल्पतून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडा !

 कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

          मुंबई दि :-17

-
पूर्णा प्रकल्पावर रब्बी हंगामासाठी आवश्यक असणारा पाणीसाठा उपलब्ध असल्याने  त्याचा चांगला  लाभ हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा,यासाठी 20 नोव्हेंबर पासुन  पाण्याचे आवर्तन तात्काळ सोडण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.

            पूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यासंदर्भात बैठक मंत्रालयात पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  या बैठकीस आ. चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अधीक्षक अभियंता बी. आर. शेटे, कार्यकारी अभियंता एस. बी. बिराजदार ऑनलाईन उपस्थित होते.

 शेवटच्या शेतकऱ्याला लाभ द्या!

            रब्बी हंगामासाठी 20 नोव्हेंबर पासुन पहिले आवर्तन सुरु करण्यात यावे. तसेच अपेक्षित पाणी पाळ्या विहित मुदतेत पूर्ण कराव्यात. तसेच या आवर्तनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळेल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिल्या.  शेतकऱ्यांमध्ये पाणीपट्टी भरण्यासंदर्भात जनजागृती करण्याची ही सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. तसेच आवर्तन सोडण्या अगोदर कॅनॉलच्या परिसरातील शेतकऱ्यांना अगोदर माहिती द्यावी जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी दिल्या.

या रब्बी हंगामासाठी एकूण तीन आवर्तन सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिली.

 

*****

No comments: