25 November, 2022

 

रोजगार सेवकांनी मनरेगामधून रेशीम उद्योगाचा गट करुन गाव समृद्ध करावा

- उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांचे आवाहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 25 : प्रत्येक रोजगार सेवकांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये दहा ते वीस शेतकऱ्यांचा गट करुन मनरेगा योजनेमधून रेशीम उद्योग करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांनी केले. तसेच  रेशीम शेती ही येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने फायद्याची आहे हे सह प्रमाण त्यांनी पटवून सांगितले.

महा रेशीम अभियानांतर्गत आज वसमत तहसील कार्यालय आणि जिल्हा रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व रोजगार सेवकांची एक दिवसीय कार्यशाळा तहसील कार्यालय वसमत येथे भरविण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी वसमत तालुक्यातील 105 रोजगार सेवक उपस्थित होते.

यावेळी वसमत तालुक्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे साहेब यांनी रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन रोजगार सेवकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या. या कार्यशाळेसाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे, प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी  खान, तांत्रिक सहाय्यक जांबुतकर यांनी सविस्तर पीपीटीसह मार्गदर्शन करताना त्यांनी सर्व रोजगार सेवकांच्या शंकेचे निरसन करुन रेशीम योजना सेवा आणि मेवा कशा पद्धतीने राबविता येईल याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

या कार्यक्रमात शेतकरी प्रतिनिधी म्हणून पांगरा शिंदे येथील प्रगतशील शेतकरी दीपक शिंदे, हयातनगरचे प्रगतशील शेतकरी धनाजी सारंग, आंब्याचे प्रगतशील शेतकरी सुरेश भोसले, पिंपळगाव कुटेचे प्रगतशील शेतकरी सुरेश कुटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भेंडेगाव चौकी सेंटरचे चालक कपिल सोनटक्के यांनी करुन सर्व रोजगार सेवकांना ग्रामस्तरावर येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने सोडवाव्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी  कपिल जमदाडे, गजानन सोनटक्के, संतोष चव्हाण यांनी मेहनत घेतली.

****

No comments: