16 November, 2022

 



बालगृहातील मुला-मुलींना योग्यवेळी कौतुकाची थाप दिल्यास

त्यांचे भावी आयुष्य सुंदर घडण्यास मदत

                          -  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : बालगृह व मूलींचे निरीक्षणगृह येथील सर्व मुला-मुलींना योग्य वेळी कौतुकाची थाप देणे गरजेचे असून त्यांचे पुढील आयुष्यास योग्य वळण लाभून त्यांचे भावी आयुष्य सुंदर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर महिला व बाल विकास विभागामार्फत आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सव 2022-23 च्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते. यावेळी हिंगोली बालकल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, आदर्श महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विलास आघाव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, परीवीक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृतीदल समन्वयक सरस्वती कोरडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. 

            जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले की, समाजातील दुर्लक्षित मुला-मुलींना मोठे करणे, शारीरिक व मानसिक आधार देणे हा शासनाचा मूळ उपक्रम व गाभा असून  त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास विभागाने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोस्तव 2022-23 उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.  ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले नाहीत त्यांना पुन्हा जोमाने प्रयत्न करण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. याप्रसंगी बालकल्याण समिती हिंगोलीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले व आदर्श महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विलास अघाव यांनी बालगृह व मुलींचे निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  

प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संरक्षण अधिकारी माया सुर्यवंशी यांनी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हिंगोली यांच्या अधिनस्त बालगृह व मुलींचे निरीक्षणगृह येथील विधी संघर्षग्रस्त, अनाथ, निराधार, निराश्रीत व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेकांशी आदर, बंधुभाव सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कला व सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, हिंगोली व  जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

****

No comments: