09 November, 2022

 

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी

सर्व यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2022-2023 वर्षातील कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी त्यांना मंजूर केलेली तरतूद, उपलब्ध निधी याचे योग्य नियोजन करुन प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तात्काळ सादर करावा. आयपासचा शंभर टक्के वापर करावा. एकमेकाशी समन्वय ठेवून निधी खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

तसेच सन 2023-24 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाच्या खर्चाचा प्रस्ताव योग्य नियोजन करुन सादर करावा. तसेच ज्या कार्यालयांनी सन 2023-24 चा प्रारुप आराखडा अद्याप सादर केला नाही त्यांनी तात्काळ सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

 या बैठकीत पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, क्रीडा, आरोग्य, महावितरण, शालेय शिक्षण, जलसंधारण, पाणीपुरवठा, नगरविकास, कृषी, बांधकाम, उद्योग, रेशीम यासह विविध विभागाचा आढावा घेतला.

यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

****

No comments: