29 November, 2022

 


राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन व हळद महोत्सव यशस्वी करण्यासाठी

सर्वांचे सहकार्य आवश्यक

--- खा.हेमंत पाटील

            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन व हळद महोत्सवाचे डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. आपल्या शहराचे, जिल्ह्याचे नाव लौकिक  वाढविण्यासाठी हे कृषि प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले .

            येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व हळद महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी पुढे बोलताना खा. हेमंत पाटील म्हणाले, आपला जिल्हा हळदीचा जिल्हा आहे. याचा भारतभर प्रचार व प्रसार झाला पाहिजे यासाठी डिसेंबर महिन्यात आयोजित कृषी प्रदर्शनात विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात नामांकित कंपन्या, उत्पादक सहभागी होणार आहेत. हळद उत्पादनाबाबत हिंगोलीचे नाव आपल्या देशात  झळकण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच सर्व शासकीय विभागानी आपल्या कार्यालयाशी संबंधित योजनेचे स्टॉल उभारावेत. यासाठी प्रत्येक विभागानी कामाचे नियोजन करुन कामकाज करावेत. तसेच प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय, वाहन पार्कींग यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसेच यावेळी प्रदर्शनामध्ये कोणकोणत्या विषयाचे प्रदर्शन मांडता येईल याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली .

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.

            जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी नियोजित कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाची माहिती प्रास्ताविकात दिली.

            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित राहून चर्चेत सहभाग नोंदवला .

****

No comments: