20 November, 2022

 

दोन दिवशीय हिंगोली ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

 

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकून राहते

-- जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव





 

हिंगोली (जिमाका), दि. 20 :  मागील दोन दिवसापासून ग्रंथोत्सवात विचाराची मेजवानी मिळत आहे. सध्या समाज माध्यमाचा वापर वाढला आहे. पुस्तक वाचून जसा आनंद मिळतो तसा आनंद समाज माध्यमातून मिळत नाही. त्यामुळे आपले आवाहन टिकवून ठेवण्यासाठी पुस्तक वाचणे आवश्यक आहे. या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने वाचन संस्कृती टिकवून राहत आहे, असे सांगून जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सवाचा समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे खंडेराव सरनाईक हे होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, संतोष ससे, मनोहर गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, ग्रंथालय सहायक संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी आदी उपस्थित होते.

ग्रंथालय सहायक संचालक सुनिल हुसे यांनी वाचनाची आवड वृध्दींगत व्हावी या उद्देशाने ग्रंथोत्सव घेण्यात आला आहे, असे सांगून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ग्रंथालय सेवा सदृढ झाली पाहिजे. कुठलीही तक्रार न येऊ देता ग्रंथालयानी सेवा द्यावी, असे सांगून ग्रंथोत्सवाचे उत्कृष्टरित्या आयोजन केल्याबद्दल संयोजकाचे अभिनंदन केले. 

ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांनी हा ग्रंथोत्सव अत्यंत उत्कृष्ट रितीने पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देऊन अशा प्रकारचे काम सर्व ठिकाणी सतत झाले पाहिजे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांनी बालकांमध्ये वाचन चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाने बालवाचन कक्ष समृध्द केले पाहिजे, असे सांगून या महोत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले, तर आभार मिलींद सोनकांबळे यांनी मानले. याप्रसंगी ग्रंथविक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: