10 November, 2022

 

हिंगोली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

* जिल्ह्यात निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू

* 18 डिसेंबर रोजी होणार मतदान

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  ऑक्टोबर, 2022 ते डिसेंबर, 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंच निवडीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीचे सदस्य आणि थेट सरपंच निवडीसाठी 18 डिसेंबर, 2022 रोजी मतदान होईल. आजपासून या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, दि. 18 नोव्हेंबर, 2022 रोजी संबंधित तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 28 नोव्हेंबर, 2022 ते  शुक्रवार, दि. 2 डिसेंबर, 2022 दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत.

नामनिर्देशनपत्र छाननी सोमवार, दि. 5 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी अकरापासून सुरु होईल. तसेच बुधवार, दि. 7 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी तीननंतर  निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

आवश्यक असल्यास रविवार, दि. 18 डिसेंबर,2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेतले जाईल. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी 20 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 23 डिसेंबर, 2022 पर्यंत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील 07, वसमत-13, हिंगोली-16, कळमनुरी-16 व सेनगाव तालुक्यातील 10 अशा एकूण 62 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. या सर्व तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्या ग्रामपंचायत हद्दीत आदर्श आचार संहिता लागू असेल.

*****

No comments: