19 November, 2022

 

 रस्ते अपघातातील बळी पडलेल्या नागरीकांचा स्मरण दिनानिमित्त 20 नोव्हेंबर रोजी

उप प्रादेशिक परिहवन कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जगभराप्रमाणे भारतातही या वर्षा नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी म्हणजेच दि. 20 नोव्हेंबर, 2022 रोजी रस्ते अपघातातील बळी पडलेल्या नागरीकांचा स्मरण दिन (World Day for Remembrance of Road Traffick Victims) म्हणून पाळण्यात येणार आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे रस्ते अपघातात दररोज जवळपास 3400 नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच कित्येकांना आयुष्यभरासाठी जायबंदी होऊन परावलंबी जीवन जगावे लागते. आपल्या भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख नागरिक रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावतात. म्हणजेच दररोज सुमारे 411 भारतीयांचा रस्ते अपघातामध्ये बळी जातो. आपल्यापैकी बहुतांश जण या घटना नेहमीचीच गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतो. बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा मानसिक व आर्थिक धक्का असतो. रस्ते अपघातातील होणारी ही हानी त्यांच्यासाठी कल्पनेपलीकडची असते. त्यामुळे रस्ते अपघाताबद्दल जगभरात जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी 2011 ते 2020 हे दशक रस्ते अपघात मृत्यू कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचे दशक जागतिक पातळीवर पाळण्यात आले होते. तथापि, प्रश्नांची गंभीरता लक्षात घेता 2021 ते 2030 या दशकात शाश्वत विकास उद्दिष्टाअंतर्गत रस्ता सुरक्षा उपाययोजनांची उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत.

जगभरात रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची आठवण व मृतकांच्या नातेवाईकांप्रती संवेदना म्हणून जागतिक आरोग्य संघटनेतर्फे नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा रस्ते अपघातातील मृतांचा स्मरणदिन म्हणून पाळला जातो. रस्ते अपघातातील मृतकांची आठवण म्हणून स्मरण दिन पाळण्याची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये 1993 साली कांही स्वयंसेवी संस्थांकडून झाली. पुढे 2005 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने एका ठरावांद्वारे नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा रस्ते अपघातातील बळी गेलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ जगभरात दरवर्षी पाळण्याचे घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक आरोग्य संघटना, रोडपीस, युरोपियन फेडरेशन ऑफ ट्रॅफिक व्हिक्टीम अशा संस्थांद्वारे जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून रस्ता सुरक्षाविषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या स्मरणदिनानिमित्त संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वॉकथॉन (Walkathon) चे सकाळी 8.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: