09 November, 2022

 

लम्पी आजार वाढत असल्याने पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

            हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव होत असून लम्पी आजाराने बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

राज्यभरात अनेक जिल्ह्यांत लम्पी आजाराचा शिरकाव झालेला असताना हिंगोली जिल्हा यापासून लांब होता. एकही बाधित जनावर आढळले नव्हते. तरीही पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव होण्यापूर्वीच जनजागृतीसह लसीकरण मोहिम हाती घेतली होती. मात्र, लम्पीचा शिरकाव होताच बाधित जनावरांची संख्या वाढत गेली. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती देत आतापर्यंत 2 लाख 35 हजार 830 जनावरांचे लसीकरण करत 101.56 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे.

जिल्ह्यातील 87 गावांत लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून आतापर्यंत 1285 बाधित जनावरे आढळली आहेत. यातील 407 जानावरे बरी झाली आहेत. सध्या 831 जनावरांवर उपचार सुरु असून यातील 54 जनावरे गंभीर आजारी आहेत. उपचार होत असले तरी आतापर्यंत 47 बाधित जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागआणखी दक्ष झाला आहे. 2 लाख 41 हजार 800 लस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशु वैद्यकीय अधिकाऱ्यास माहिती द्यावी. लम्पी आजाराने बाधित जनावर वेगळे ठेवावे. चारा-पाण्याची व्यवस्था स्वतंत्र करावी. तसेच लम्पीबाधित गोठा सोडियम हायपोक्लोराईडने फवारुन घ्यावा. गोचिड, पिसवा, माशांचा नायनाट करण्यासाठी सायपरमेथरीन किंवा डेल्टामेथरीनची फवारणी नियमित करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. कदम यांनी  केले आहे.

*****

No comments: