17 November, 2022

 


नशामुक्त भारत अभियानांतर्गत’

भव्य व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

 

             हिंगोली (जिमाका), दि. 17 :    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली व नशाबंदी मंडळ, हिंगोली मार्फत राज्य परिवहन मध्यवर्ती बसस्थानक, हिंगोली या ठिकाणी नशामुक्त भारत अभियानांतर्गत भव्य व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते  करण्यात आले.

                  याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, राज्य परिवहन महामंडळ हिंगोलीचे आगार व्यवस्थापक पी.बी. चौथमल, नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, संजय बोरा यांची उपस्थिती होती.

                याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दैने यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, व्यसन म्हटले की फक्त दारु व तंबाखू, सिगारेट या बद्दलच विचार करण्यात येतो, परंतु वय 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेल्याचे दिसून येते. हे पण एक प्रकारचे अतिशय घातक असे व्यसन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध शाळांमध्ये टेबल तपासणी करण्यात येत असून याद्वारे विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी व शिक्षकांचे खिसे तपासणी करण्यात येत आहेत. याद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये व्यसनाधिनतेबद्दल जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

               यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, राज्य परिवहन महामंडळ हिंगोलीचे आगार व्यवस्थापक पी.बी. चौथमल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील नागरिक, प्रवासी, दिव्यांग शाळेचे कर्मचारी, अनुदानित वसतिगृहांचे कर्मचारी, समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार संजय बोरा यांनी मानले.

*****

No comments: