21 November, 2022

 

महाराष्ट्र युवा संसद-2022 साठी  हिंगोलीच्या दोन युवकांना संधी

 


हिंगोली (जिमाका), दि. 21 :  नेहरु युवा केंद्र संघटन महाराष्ट्र & गोवा आणि युनिसेफ द्वारा  मुंबई  विद्यापीठ येथे दि. 14 ते 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र युवा संसद-2022 चे आयोजन  करण्यात आले होते. या युवा संसदेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन युवक आपापल्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आले  होते. हिंगोली जिल्ह्याचे  प्रतिनिधित्व करण्यासाठी  नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी  आशिष पंत यांनी प्रवीण पांडे व संदीप शिंदे यांना पाठवले होते.

या महाराष्ट्र युवा संसद-2022 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी होते. या कार्यक्रमात नेहरु युवा केंद्राचे राज्य निर्देशक प्रकाशजी मनुरे, युनिसेफ  महाराष्ट्राचे प्रमुख तानाजी पाटील, जिल्हा युवा अधिकारी, विद्यार्थी, नागरिक आदी  सहभागी होते.

दि. 14 नोव्हेंबर रोजी  सर्व युवकांना  महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषद,  सेंट्रल हॉल, राजभवन, दरबार हॉल पाहण्यासाठी नेले व त्यांना तेथील सर्व माहिती सांगितली. नंतर विद्यापीठ येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमामध्ये दाखविण्यात आले.

दि. 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते  कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व युवकांना शुभेछा देऊन भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर जशी आपली भारताताची संसद चालते त्याचप्रमाणे विद्यापीठात संसदेचे आयोजन करण्यात आले होते. जे युवक प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते. त्यांच्यातील काही युवकांचे मंत्री, मंत्रिमंडळ करण्यात आले. तसेच बाकीच्या युवकांना आपल्या जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या भारतातील, राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील जे काही प्रश्न आहेत, ते त्या  ठिकाणी मांडण्याची संधी दिली. यामध्ये जे प्रश्न मांडण्याल आले त्याचे निराकरणही केले. काही विधेयके मांडण्यात आली आणि ती पास सुध्दा करण्यात आली. नंतर कार्यक्रमाचा समारोप करुन युवकांना प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती जिल्हा नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी दिली आहे.

*****

 

No comments: