25 January, 2024

 

वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत

बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

 


हिंगोली (जिमाका), दि. 25 : वसमत तालुक्यातील मौजे टाकळगाव येथे वसमत येथील हुतात्मा बहिजी स्मारक महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीरामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार शिवीरामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बाल संरक्षण अधिकारी श्री. मोरे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा, 2006 नुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे असे निर्देशित करण्यात आलेले आहे. जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात य अशा गुन्ह्यास एक लाख रुपय दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. तसेच सर्व यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत व या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले. जिल्हा बाल संरक्षणा कक्षातील बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेलो बालके या बद्दल माहिती दिली व त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी बालकांसाठी तात्काळ मदत करणारा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली असल्याचे सांगून जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, असे आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केले,

या कार्यक्रमासाठी वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ करुणा देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकांत गावंडे, महिला सह. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. पाटील, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, बाल संगोपन योजना संस्था वसमत येथील संतोष चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत सोनटक्के, विद्यार्थिंनी प्रतिनिधी कोमल भुसावळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्याथी उपस्थित होते.

*******

No comments: