25 January, 2024

 

जवळाबाजार येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

मतदान हाच बळकट लोकशाहीचा पाया

                                        -डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी

 



हिंगोली (जिमाका), दि. 25 : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा  मुळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले, माजी सभापती डॉ. नवले उपस्थित होते.

            मतदार दिनाचे औचित्य प्रसंगी डॉ.सचिन खल्लाळ यांनी "मतदान हाच बळकट लोकशाहीचा पाया" असून त्यासाठी आपण सजग, नीतिमान, समाजकार्याची तळमळ असणारा तसेच विकास करण्याची आवड असणारा उमेदवार मतदानाच्या माध्यमातून निवडून दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले. तसेच शाळेतील एक हजार  विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थी हेच प्रगल्भ लोकशाहीचे भावी आधारस्तंभ आहेत, हे सांगत विद्यार्थ्यांना यशाचा व बळकट  लोकशाहीचा मूलमंत्र सांगताना साध्य-साधन-साधक यांची एकाग्रता किती महत्वाची असते हे स्व अनुभव व महाभारतातील अर्जुन - कर्ण यांची कथा सांगत पटवून दिले.

गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले यांनी लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगताना आपल्या एका मताचे मूल्य प्रतिपादित केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा मुळे यांनी संस्था आणि संस्थेचे वैभव म्हणजे विद्यार्थी असल्याचे सांगितले.

            याप्रसंगी सर्व उपस्थित शिक्षक , विद्यार्थी , बीएलओ यांच्या समवेत राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शाळेत आयोजित विविध स्पर्धांचे निरीक्षण , परीक्षण करुन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

            कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी के. के. गोरे , केंद्रप्रमुख पठाडे, केशव सारंग, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बांगर व शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व बीएलओ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

******

No comments: