04 January, 2024

 

हिंगोली येथे महासंस्कृती व महानाट्य महोत्सवाचे आयोजन

 



  • महोत्सव यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करुन विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्याची माहिती जनसामान्यापर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने हिंगोली येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्गंत हा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती व महानाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. शासन निर्णयान्वये या महासंस्कृती व महानाट्य महोत्सवाच्या आयोजन व सुयोग्य नियोजनासाठी समन्वय व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 3 जानेवारी, 2024 रोजी पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणचे कार्यकारी अभियंता, पर्यटन विभागाचे क्षेत्रिय अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, सांस्कृतिक कार्य विभागाचे  सहाय्यक संचालक, पुरातत्व, पुराभिलेख विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी आदी या समितीचे सदस्य असून निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडतील.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रमाचेआयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाचे विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे  तसेच तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची , चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, तसेच छत्रपती शिवाजी मराहाज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिध्दी मिळावी यासाठी जिल्ह्यात महानाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही पाच दिवशीय महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

********

No comments: