21 April, 2022

 

अन्न व्यवसायिकांनी फोसकॉस ऑनलाईन प्रणालीवर

भ्रमणध्वनी व ई-मेल पत्ता अद्यावत करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका),  दि. 21 : सद्यस्थितीत सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात येणारे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे फोसकॉस (FosCos.fssai.gov.in) या संकेतस्थळावर अर्ज केल्यावर प्राप्त होतात. तथापि बऱ्याच वेळा अर्ज करताना भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता हा अन्न व्यवसायिक यांच्या स्वत:चा नसतो. तसेच बहुतांश वेळी भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता बदललेला असतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याद्वारे पाठवण्यात आलेल्या सूचना , सुधारणा नोटीस, कायदेशीर नोटीस व काही अधिसूचना पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच अन्न परवाना, नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरण करताना बऱ्याच अडचणी येतात.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिक परवानाधारक, नोंदणी धारक ज्यामध्ये खाद्यपदार्थ उत्पादक, रिपाकर, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, वितरक, हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिक, फिरते विक्रेते व इतर सर्व अन्न व्यवसायिकांनी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता अद्यावत करुन घ्यावेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, परभणी यांच्याकडे लेखी स्वरुपात अर्ज सादर करावा. या अर्जासोबत परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड आदी जोडून कार्यालयात दाखल करुन समक्ष अद्यावत करुन घ्यावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

No comments: