05 April, 2022



 

बालविवाह निर्मूलन कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

           हिंगोली, (जिमाका) दि. 05 : जिल्ह्यातील बाल विवाहाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्याचा विभागनिहाय तयार केलेला कृती आराखडा एकत्रित करावा. त्यामध्ये राहिलेल्या बाबींचा समावेश करुन त्यांची सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

               येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहावीयर चेंज कम्युनिकेशन (SBC3) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती दल समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियरचेंज कम्युनिकेशनचे  संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक निशीत कुमार यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले , सर्व विभागासाठी मानक कार्यपध्दती तयार करुन जिल्ह्यातील सर्व सरपंचांना बालविवाह निर्मूलन कायद्याची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. यासह इतर विभागाने एकत्रितरित्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे व बाल विवाह निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. एकही मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी व पालावर राहणाऱ्या प्रत्येक मुलांला मोफत शाळेत प्रवेश देण्यात यावा. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करावे. तसेच अंगणवाडी व आशा पर्यवेक्षकांना देऊन शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील मुलींना आरोग्य शिक्षण आणि आहाराबाबत मार्गदर्शन करावे. फ्रंटलाईन वर्करच्या माध्यमातून व युनिसेफच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा व गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयारी करावी. बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. किशोरवयीन मुलींमध्ये प्रबोधन करुन त्यांना उच्च शिक्षण आणि आरोग्याबाबत जागरुक करावे. अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांना कौशल्य विकास योजनेतून त्यांना ज्या विषयात आवड आहे त्या विषयीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे. तसेच सक्षम युवा शक्ती अभियानाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन सर्व ठाणे हद्दीतील गावामध्ये जननी महिला सक्षम समाज अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या अभियानाद्वारे प्रत्येक गावात पोलीस अधिकारी, कर्मचारी जाऊन व्हिडीओ सादरीकरण, बॅनर, पोस्टर व समुपदेशन करुन महिलांच्या कायद्याची जनजागृती करणार आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार प्रत्येक गावात जाऊन स्त्रीभ्रूण हत्या, महिला अत्याचार, नाबालिक, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृध्द महिला व बालकांचे लैंगिक शोषण, मानसिक व आर्थिक शोषण, अत्याचार पिडित महिला आदींची जनजागृती करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार प्रत्येक विभागांने आपला प्रतिनिधी उपलब्ध करुन दिल्यास सर्व विषयाची जनजागृती एकाच वेळी करणे शक्य होणार आहे. याचा सर्व महिलांना व बालकांना फायदा होणार आहे, असे सांगितले.    

युनिसेफ (UNICEF) चे प्रतिनिधी निशीत कुमार यांनी  महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग आणि एकात्मिक बाल विकास या विभागाशी समन्वय ठेवून जिल्ह्याचा कृती तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच संबंधित विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यात काही सुधारणा सुचवल्या. तसेच पोस्टर, होर्डींग व सोशल मिडियाच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही श्री.कुमार यावेळी म्हणाले.

हिंगोली जिल्हा बाल विवाह निर्मूलन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग आणि एकात्मिक बाल विकास या विभागानी तयार केलेल्या कृती आराखड्याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांनी दिली .

या बैठकीस नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, जिल्हा माहिती कार्यालयाचे चंद्रकांत कारभारी, माध्यमिक शिक्षण विभागाचे एस.एन. कडेलवार, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी तथा जिल्हा कृतीदल समन्वयक सरस्वती कोरडे, एसबीसी3 च्या कार्यक्रम प्रमुख पूजा यादव, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ.सुभाष शेरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे हिंगोली जिल्हा समन्वयक डॉ. एस.एस. मगरकर, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी, कायदा व परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, क्षेत्रीय कार्यकर्ता उपस्थित होते.

****

No comments: