27 April, 2022

 


महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात

संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते दिनांक 1 मे रोजी येथील पोलिस कवायत मैदानावर सकाळी 8.00 वाजता होणार आहे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. 

महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या सर्व विभागानी आपली जबाबदारी योग्यपणे व इतर विभागाशी समन्वय ठेवून पार पाडावी. सर्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस मुख्यालयावर मुख्य ध्वजारोहणाच्या अनुषंगाने मंडप, मैदानाची दुरुस्ती, ध्वजस्तंभाची रंगरंगोटी या व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.  त्याप्रमाणेच मुख्य कार्यक्रमात पथ संचलनात सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचारी व विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

****

No comments: