28 April, 2022

 महाराष्ट्र दिनी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजनांचा जागर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : राज्यातील गावागावात येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अमलात आणली असून या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार दि. 1 मे , महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिका यांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री, ग्रामीण भागात लोक प्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत योजनांचे संक्षिप्त स्वरुपात वाचन करण्यात येणार आहे.

यावर्षी देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाने राज्य निर्बंधमुक्त होताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 11 दिवस विविध उपक्रम आयोजित करुन साजरी करण्यात आली.

अनुसूचित जाती, नवबौध्द घटक यासह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांची जनजागृती करुन तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन होणाऱ्या शासकीय आस्थापनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहिती पत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले आहे. या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत येत्या महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.  

****

No comments: