22 April, 2022

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना

किसान क्रेडीट कार्ड देण्यासाठी ‘‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’’मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका),  दि. 22 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी दि. 24 एप्रिल ते 1 मे, 2022 या कालावधीत ‘‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ही मोहिम दि. 24 एप्रिल ते 1 मे, 2022 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 01 लाख 90 हजार लाभार्थ्यांपैकी 01 लाख 40 हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करावयाचे आहे. यासाठी 24 एप्रिल रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष ग्रामसभेत किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज वाटप करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात भरलेले अर्ज ग्रामसेवकांच्या मार्फत बँक शाखेमध्ये जमा करावयाचे आहेत.

ही मोहिम जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, महसूल, सहकार, ग्रामविकास, कृषी , पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित बँकांनी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत ग्राम सेवकांच्या मार्फत घेऊन त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची आणि त्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार प्रमाणित पेमेंटसाठी अधिकृत करुन घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित बँकांना दिलेल्या आहेत.

******

No comments: