27 April, 2022



 अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर एकही बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी

                                                         - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

         हिंगोली (जिमाका) दि.27 : जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यांसोबत बालविवाह ही  भेडसावणारी महत्वपूर्ण समस्या बनली आहे. सततचे लॉकडाऊन बंद, ऑनलाईन शाळा , बेरोजगारी यामुळे बाल विवाहाचे प्रमाण जिल्हाभरात वाढत आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या  एक वर्षाच्या काळात जिल्ह्यातील एकूण 1 हजार 338 बाल विवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.

         अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहूर्त 3 मे, 2022 रोजी असल्याने या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीन पात्र गुन्हा आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीया या दिवशी महाराष्ट्र राज्यात देखील बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण पाऊल उचलने अत्यंत गरजेचे आहे.

         बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम,2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे .  अशा गुन्ह्यास  एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची योग्य ती  खबरदारी घ्यावी  आणि बालविवाह झाल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल.

जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******

No comments: