10 December, 2022

नद्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी

‘‘चला जाणूया नदीला’’अभियानाची हिंगोली जिल्ह्यात घोडदौड

                                   




                भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘‘चला जाणूया नदीला’’ या अभियानाखाली 75 नद्यांच्या नदी संवाद यात्रेचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम वर्धा येथून झाली आहे. त्यास अनुसरुन हिंगोली जिल्ह्यातील कयाधू व आसना नदी संवाद यात्रेचा शुभारंभ दि. 18 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते कलश पूजन करुन करण्यात आला आहे. या नदी संवाद यात्रेत हिंगोली जिल्ह्यातील कयाधू व आसना नदीच्या खोऱ्यातील व त्यांच्या उपनद्याच्या गावांमधील ग्राम पंचायती, लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवरील विद्यार्थी, महिला, शेतकरी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. चला जाणूया नदीला हे अभियान नद्या समजून घ्याव्यात, त्यासाठी आवश्यक असणारी जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी सुरु करण्यात आले आहे. ही नदी संवाद यात्रा नेमकी कशी असेल, याचा उद्देश काय असेल याविषयी हा लेख…

‘‘चला जाणूया नदीला’’ अंतर्गत नदी संवाद यात्रेचे कामकाज जिल्हा समितीचे अध्यक्ष  तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या सक्रीय सहभाग व मार्गदर्शनाखाली समितीचे सदस्य सचिव विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे यांच्या पुढाकाराने अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने हिंगोली जिल्ह्याची घोडदौड सुरु आहे.

गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील  ताण वाढला आहे. प्रदुषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये, जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता, साठवण क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत जिल्ह्यातून वाहणाऱ्या निवडक नद्यांबाबतची माहिती, तिचा प्रचार, प्रसार आणि त्या अनुषंगिक बाबी हाताळण्यात येणार आहेत.

                महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांनी राजस्थान सारख्या वाळवंटी राज्यातील 12 नद्यांना पुनर्जिवित केलेले मॅगसेसे ॲवाड प्राप्त जल पुरुष तथा जागतिक दुष्काळ व पूर नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनर्जिवनावर काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व महाराष्ट्र जलबिरादरीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेऊन ‘‘चला जाणूया नदीला’’ हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 30 सप्टेंबर, 2022 रोजी पहिला शासन निर्णय काढून राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली व इतर प्रधान सचिव आणि सचिवांच्या सदस्यत्वाखाली राज्य पातळीवरील ‘‘चला जाणूया नदीला’’ राज्य समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये विशेष निमंत्रित म्हणून डॉ.राजेंद्र सिंग व सदस्य म्हणून जयाजी पाईकराव, डॉ. सुमंत पांडे, नरेंद्र चौघ, रमाकांत कुलकर्णी, डॉ.गुरुदास नुलकर, अनिकेत लौयीया, राजेश पंडित, महेंद्र महाजन आदी सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

                समितीचे सदस्य, समितीचे उद्दिष्ट व कार्यपध्दतीबद्दल सविस्तर माहिती दि. 14 ऑक्टोबर, 2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे.

चला जाणूया नदीला नदी संवाद यात्रेची उद्दिष्टे :

                1. नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे.

                2. जनसामान्यांना नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे.

                3. नागरिकांच्या सहकार्याने नदींचा सर्वकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे.

                4. अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे .

                5. नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे.

                6. नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार, प्रसार याबाबत नियोजन करणे.

                7. नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याबाबतची माहिती संकलित करणे.

                8. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे.

                9. अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे.

                10. नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे.

                11. नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे .     

                जिल्हा पातळीवर चला जाणूया नदीला जिल्हा समिती स्थापन करण्याच्या सूचना दि. 17 ऑक्टोबर, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील कयाधू आणि आसना नदीचा व त्यांच्या उपनद्यांचा समावेश करण्यात आला. संबंधित नद्या व उपनद्यांच्या नदी प्रहरी, समन्वयकांचा सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाच्या सहाय्यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती गठीत करण्यात आली आहे.

                या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तर सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने  हे राहणार आहेत. या समितीवर सचिव म्हणून विभागीय वन अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी (स्थानिक स्तर), भूजल सर्वैक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,  जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विभागीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक, सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा नियोजन अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक, उपायुक्त पशुसंवर्धन याची तर अशासकीय सदस्य म्हणून जयाजी पाईकराव, डॉ.संजय नाकाडे, डॉ.किशन लखमावार यांची निवड करण्यात आली आहे.

                कयाधू आणि आसना नदीला पुनरर्जिवित करण्याच्या दृष्टीने जिल्हा पातळीवर तांत्रिक समितीसह इतर दोन समित्यांची स्थापना करण्यात आली. तसेच दि. 11 नोव्हेंबर रोजी नवीन सदस्यांचा समावेश करुन जिल्हा समितीचा विस्तार व इतर तीन समित्यांची स्थापना करण्यात आली .

                नदी अभ्यास, समस्या विश्लेषण, निदान व उपचार तांत्रिक समिती :

                या समितीमध्ये रोहयोचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, विभागीय वन अधिकारी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधन अधिकारी, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक, पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, पोकराचे प्रकलप संचालक, रेशीम उद्योग कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी (स्थानिक स्तर), उगम ग्रामीण विकास संस्थेचे सुशांत पाईकराव यांचा समावेश आहे.

                लोकशिक्षण व जाणीव जागृती समिती :

                या समितीमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्काऊट गाईडचे जिल्हा समादेशक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक, डायटचे प्राचार्य, हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त, आत्माचे प्रकल्प संचालक यांचा समावेश आहे.

                माहिती संकलन व समन्वयक समिती :

                या समितीमध्ये सुशांत पाईकराव, सुधीर सभादिंडे, विलास आठवले, राहूल साळवे, हरिभाऊ पट्टेबहादूर, दिनेश जमदाडे, हरिभाऊ खनपट्टे, दत्ता घुगे, बालाजी नरवाडे, पुरुषोत्तम मोतीपवळे, सिध्दार्थ कंदारे, राम खंदारे, तानाजी भोसले, आकाश मोगले, उत्तम पाईकराव, दयानंद कदम यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे.

                हे अभियान एकूण तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तालुका पातळीवरील समित्यांचे गठन करणे. तालुका पातळीवरील बैठका व माहिती संकलनाचे विहित नमुन्यातील फॉर्मचे वितरण करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात दि. 28 ते 30 डिसेंबर, 2022 या कालावधीत आसना नदी संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या नदी जनसंवाद यात्रेचे उद्घाटन दि. 29 डिसेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे होणार आहे. त्यानंतर ही यात्रा दि. 30 डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील आंबा चोंढी, दि. 31 डिसेंबर रोजी कुरुंदा येथून नांदेड जिल्ह्यातील निळा येथे प्रवेश करण्यात येणार आहे. यावेळी कलश हस्तांतरण करण्यात येणार आहे.

कयाधू नदी संवाद यात्रा ही 01 जानेवारी, 2022 रोजी रिसोड तालुक्यातील आगरवाडी, कंकरवाडी येथून सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव येथे येणार आहे. दि. 02 जानेवारी रोजी सेनगाव तालुक्यातील जयपूर, दि. 3 जानेवारी रोजी सेनगाव तालुक्यातील कोळसा, दि. 4 जानेवारी रोजी सेनगाव, दि. 5 जानेवारी रोजी ब्रम्हपुरी तांडा, दि. 6 जानेवारी रोजी हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव, दि. 7 जानेवारी रोजी सवड, दि. 8 जानेवारी रोजी हिंगोली येथे रॅली, श्रमदान व सिंचन परिषदेचे आयोजन, दि. 9 जानेवारी रोजी समगा, दि. 10 जानेवारी रोजी वसई, 11 जानेवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, 12 जानेवारी रोजी कोंढूर, 13 जानेवारी रोजी डोंगरगाव पूल, 14 जानेवारी रोजी आखाडा बाळापूर येथे विश्रांती, दि. 15 जानेवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे समारोप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 16 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील हदगाव कडे प्रयाण करणार आहे.

तसेच दि. 17 जानेवारी ते 23 जानेवारी, 2023 या कालावधीत विविध शाळा, महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर दि. 26 जानेवारी, 2023 रोजी जिल्हास्तरीय समारोप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र व पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, एमआरइजीएसचे सचिव नंदकुमार, कृषी आयुक्त डवले, भास्कर पेरे, सत्यपाल महाराज, जलतज्ञ माधव चितळे, दि.मा.गोरे, जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु यांना आमंत्रित करण्याचे नियोजन आहे.

‘‘चला जाणूया नदीला’’ या मोहिमेंअंतर्गत नद्यांचे संगोपन करणे, संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. समाज आणि शासन या दोघांनी एकत्रपणे आणि समविचाराने काम करणे अनिवार्य ठरते. म्हणून ‘‘चला जाणूया नदीला’’ हे अभियान सार्थ ठरविण्यासाठी आपण सर्वांनी त्यात सहभागी होऊ या …           

 

                                                                                                                                                - चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                                                                   माहिती सहायक

    जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******

 

  

No comments: