16 December, 2022

 

लस द्या बाळा, गोवर-रुबेला आजार टाळा…!

 

            राज्यात सध्या गोवर-रुबेलाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने यावर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दि. 15 डिसेंबर, 2022 पासून जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील पालकांनी आपल्या बाळाला गोवर-रुबेलाची लस देवून या आजाराला टाळूया...

जिल्ह्यात गोवर रुबेला डोस देण्यासाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा दि. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर, 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तर मोहिमेचा दुसरा टप्पा दि. 15 जानेवारी ते 25 जानेवारी, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये 9 ते 12 महिन्यांच्या बालकांना गोवर रुबेलाचा पहिला डोस आणि 16 ते 24 महिन्यांच्या बालकांना गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. गोवर रुबेला लसीचा चुकलेला डोस या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये देण्यात येणार आहे. गोवर रुबेलाचा डोस नजीकच्या  लसीकरण सत्रात मोफत उपलब्ध आहे. हा डोस उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलाला गोवर रुबेलाचा डोस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन गोवर-रुबेलाला हरवू या,  असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

गोवर हा विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी.

सर्दी, ताप येणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. अ- जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ- जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते.

गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर/रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.

विशेष लसीकरण अभियान गरज आणि उद्दिष्ट्ये :

गोवर उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे, रुग्णसंख्या आणि मृत्यूवर नियंत्रण राखणे, सामुहिक प्रतिकार शक्ती वाढविणे, अभियान स्वरुपात लसीकरण केल्याने सामाजिक जनजागृती होऊन लोकांचे ठळकपणे वेधणे शक्य होईल. लोकसहभाग वाढेल. 20 ऑक्टोबर पासून 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित एक लाख 60 हजार मुलांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. तथापि, गोवर-रुबेला पहिला आणि दुसरा डोस न घेतलेल्या बालकांना लस देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

घ्यावयाची काळजी : बालकांना 'अ' जीवनसत्व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्या. बालकांचे नियमित लसीकरण करुन घ्या. गोवर साथीच्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळा. रुग्णाने विश्रांती घेऊन हलका आहार घेणे आवश्यक. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. पिवळी फळे, हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक. डिहायड्रेशनचे कोणतेही लक्षण असल्यास ओआरएस घ्या. लसीचा पहिला डोस 9 ते 12 महिने पूर्ण व दुसरा डोस 16 ते 24 महिने या वयोगटातील बालकांना द्या. ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे द्या. दूषित हातांचा स्पर्श तोंड, नाक यांना होणार नाही, याची काळजी घ्या. बालक घेईल त्या प्रमाणात द्रव स्वरुपात अन्न द्या. गोवरची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

- चंद्रकांत स. कारभारी, माहिती सहायक

   जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

No comments: