09 December, 2022

 

कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सव आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

 



            हिंगोली (जिमाका), दि. 09 :  कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने  केलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला.

            कृषी प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक दि. 08 डिसेंबर रोजी गुगल मीटद्वारे घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवात चार दिवस घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम, चर्चासत्राची माहिती घेतली. तसेच प्रदर्शनामध्ये स्टॉल लावण्यासाठी स्टॉल धारकांनी त्वरित मागणी नोंदवावी. पशुसंवर्धन, रेशीम, मधुमक्षिका पालन यासह विविध विषयावर चर्चासत्राचे आयोजन करावेत. यासाठी प्रत्येक विभागानी कामाचे नियोजन करुन कामकाज करावेत. तसेच प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय, वाहन पार्कींग यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसेच मान्यवरांची वेळ मिळताच प्रदर्शनाचे तारीख कळविण्यात येईल, असे सांगितले.

            यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांनी नियोजित कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाची माहिती दिली.

            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते .

****

No comments: