26 December, 2022

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज मंजूरी कॅम्पचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हास्तरीय आढावा समिती (DLRC) ची त्रैमासिक बैठक दि. 24 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस खासदार हेमंत पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (VIDEO CONFRENCE) सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जानेवारी महिन्यात मा. मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषि व हळद महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आणि सर्व बँकांनी कृषि महोत्सवात सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा बँकनिहाय सखोल अढावा घेतला. ज्या बँकांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांना उदिष्ट पूर्तीसाठी सूचना दिल्या. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उदिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व बँकेचे अधिकारी यांनी तालुकानिहाय कँम्प (शिबीर) घेऊन प्रलंबित कर्ज प्रकरणाचा निपटारा करावा. या शिबिरात सीबील स्कोअरमुळे नाकारलेले अर्जदार वगळून सर्व अर्ज केलेल्या, कर्ज प्रकरणे प्रलंबित असलेल्या, बँकेने परत केलेल्या अर्जदारांनी कागदपत्रासह उपस्थित राहावे. तसेच बँकांनी कॅम्पला उपस्थित राहून परत केलेल्या कर्ज प्रकरणाचा पुन्हा फेर विचार करुन दिलेले उदिष्ट मुदतीत पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या.

या बैठकीस आरबीआयचे एन.बी. कल्याणकर, नाबार्डचे एस. के. नवसारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.ए. कादरी, खादी ग्रामोद्योगचे अधिकारी बी. एम. राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जी. एस. देशमुख. पीडीसीसीचे एमडी बी. आर. कुरुंदकर, एसबीआयचे रामकृष्ण लंका, आरसेटीचे संचालक धनाजी बोईले इत्यादी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व बँकाचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्र व बँकेच्या अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय कॅम्पचे (शिबीराचे) आयोजन केलेले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे हिंगोली तालुक्यासाठी, बुधवार,          दि. 28 डिसेंबर, 2022 रोजी कळमनुरी येथील पंचायत समिती, गुरुवार, दि. 29 डिसेंबर रोजी औंढा नागनाथ येथील पंचायत समितीमध्ये, शुक्रवार, दि. 30 डिसेंबर रोजी वसमत येथील पंचायत समितीमध्ये व सोमवार, दि. 2 जानेवारी, 2023 रोजी सेनगाव येथील पंचायत समितीमध्ये शिबिराचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत अर्जदाराने आपल्या प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्यासाठी या शिबीरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 

*****

No comments: