08 December, 2022

 

मंडणगड पॅटर्नप्रमाणे शालेय स्तरावर मिळणार जात प्रमाणपत्र


हिंगोली (जिमाका), दि. 08 :  शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार शालेय प्रवेशासाठी तसेच पुढील विविध लाभांसाठी वेळोवेळी जात प्रमाणपत्राची मागासवर्गीय विद्यार्थी व नागरिकांस आवश्यकता भासते. तथापि, मागासवर्गीय पालकांमधील अज्ञान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी येतात. यासाठी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये ‘‘मंडणगड पॅटर्न’’ प्रमाणे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत.

                        अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी, 12 वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि, विद्यार्थी, पालक विहित कालमर्यादेत समितीकडे अर्ज सादर न केल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते. यासाठी मंडणगड पॅटर्नप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी हिंगोली जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावरुन विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.

                        त्याअनुषंगाने दि. 05 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे, संशोधन अधिकारी शिवानंद मिनगीरे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

                        या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांच्या सहाय्याने महाविद्यालय व तालुकास्तरावर शाळेतील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी कॅम्प आयोजित करुन त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालय स्तरावर जातीचे दाखले उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.

                        तसेच मंडणगड पॅटर्ननुसार जिल्ह्यातील 11 वी , 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या. मागासवर्गीय विद्यार्थी जात प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही श्री. पापळकर यांनी दिले. 

 *****

No comments: